
परळच्या भोईवाडय़ात ‘आरएसएस’च्या 25 कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम दुकानदाराला दमदाटी करून तोडफोडीची धमकी देत त्याच्या दुकानावरील ‘श्री बालाजी’चा नामफलक उतरवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या मुजोरीविरोधात दुकानचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संघाला राष्ट्रवादी मुसलमानांची अॅलर्जी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मूळचे राजस्थानी सलीम गोरी भोईवाड्यात गेल्या 25 वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. त्यांनी दीड वर्षापूर्वीच कासम शिवजी चाळ येथे नवीन दुकान कर्जावर विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. त्यांनी आपल्या दुकानाला ‘श्री बालाजी’ असे नाव दिले. मात्र दोन दिवसांपूर्वीच 20 ते 25 जणांनी त्यांच्या दुकानावर येऊन त्यांना धमकावले. त्यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच कार्यकर्ते असल्याचे सांगितले. तू जाणीवपूर्वक मुस्लिम ओळख लपवून हिंदुत्वाच्या नावावर धंदा करीत असल्याचा आरोप करीत त्याला धमकी दिली. दुकानावरील ‘बालाजी’ नावाचा बोर्ड दोन दिवसांत बदल, अन्यथा तोडफोड करू अशी धमकीच आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी दिली.
धमकीमुळे नाव बदलण्याचा निर्णय
आपण याच परिसरात 25 वर्षांपासून सलीम गोरी या नावानेच व्यवसाय करीत आहोत. दुकानाचे नाव ‘बालाजी’ ठेवून आपल्याला स्वतःचा धर्म लपवून व्यवसाय करायचा नव्हता. आम्हाला कोणत्याही धर्माचा द्वेष नाही. मात्र जिवावर बेतणाऱया धमक्या येऊ लागल्यामुळे मी आता दुकानाचे नाव ‘भोईवाडा गादी भंडार’ असे ठेवणार असल्याचे सलीम यांनी सांगितले.
आम्ही मुंबईत कोणत्याही धर्माचा पुरस्कार किंवा अवमान करीत नसताना अशा धमक्या येत असतील तर व्यवसाय करणे कठीण आहे. यामुळेच आम्ही पोलिसांत तक्रार दिली नाही. आम्हाला धमकावणाऱया कार्यकर्त्यांनी आपण ‘आरएसएस’चे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. – सलीम गोरी, दुकानदार































































