मुस्लिमांची लोकसंख्या वाढवून हिंदुस्थानात पाकिस्तान बनवण्याचा कट होता!

हिंदुस्थानात 1930 पासून पद्धतशीर नियोजन करून मुस्लिमांची लोकसंख्या वाढवण्यात आली. बंगाल, आसाम आणि सिंध प्रांत घेऊन हिंदुस्थानात पाकिस्तान बनवण्याचा कट होता. हा कट पूर्ण यशस्वी झाला नाही. परंतु हिंदुस्थानची फाळणी होऊन पाकिस्तान बनवला गेला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. अलीकडेच त्यांनी सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.

भागवत हे दोन दिवसांच्या आसाम दौऱयावर आहेत. बुधवारी गुवाहाटीमध्ये एनआरसी आणि सीएएवर लिहिलेले पुस्तक त्यांच्या हस्ते प्रकाशित केले गेले. या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी सीएए व एनआरसीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. एनआरसी आणि सीएए हे कायदे हिंदू-मुस्लिमांचे विभाजन करणारे असल्याचे भासवले जात आहे. हा विरोधकांचा कट आहे. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या कायद्यांबाबत गैरसमज पसरवले जात आहेत, असा दावा करतानाच भागवत यांनी मुस्लिम समाज आणि पाकिस्तानबाबत वादग्रस्त विधान केले.

सीएएमुळे मुस्लिमांचे काहीही नुकसान नाही

स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी अल्पसंख्याकांची काळजी घेतली जाईल, असे सांगितले होते. आतापर्यंत तसे केले गेले, आम्हीही हीच काळजी घेऊ. सीएएमुळे मुस्लिमांचे काहीही नुकसान होणार नाही. शेजारील देशांमध्ये हाल सोसणाऱया अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्याच्या हेतूने नागरिकत्व कायदा आणला जात आहे. जर बहुसंख्याकही कुठल्याही भीतीमुळे सुरक्षित राहण्यासाठी आमच्या देशात येणार असतील तर त्यांनाही आम्ही मदत करू, असेही भागवत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या