हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ‘मेलीय’, ट्रम्प यांचा मोदींना धक्का, अमेरिकेचा पाकिस्तानशी मोठा तेल करार

हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लादल्यानंतर नरेंद्र मोदींचे फ्रेंड ‘डोलांड’ ट्रम्प यांनी आज दुसरा धक्का दिला. पाकिस्तानशी मोठा तेल करार केल्याची घोषणा त्यांनी केली. एवढय़ावरच ट्रम्प हटले नाहीत. ‘हिंदुस्थानी अर्थव्यवस्था मेलीय’ असे जाहीर करत, कुणास ठाऊक एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला तेल विकेल, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. यावेळी रशियालाही त्यांनी लक्ष्य केले.

पाकसोबत झालेल्या कराराची माहिती ट्रम्प यांनी ‘टथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर दिली. ‘व्हाइट हाऊसमधील आजचा दिवस करार-मदाराचा होता. अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा झाली. पाकिस्तानशीही आम्ही एक डील केली. या करारानुसार, दोन्ही देश मिळून पाकिस्तानातील प्रचंड मोठे तेल साठे विकसित करणार आहेत. उत्खनन व शुद्धीकरणासाठी तेल कंपनीची निवड प्रक्रिया सुरू आहे,’ अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

रशिया आणि हिंदुस्थानमधील वाढत्या व्यापारी सहकार्यामुळे ट्रम्प कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. ‘हिंदुस्थान रशियाशी काय व्यापार करतो याची मला पर्वा नाही. हिंदुस्थानशी आमचा व्यापार असाही फार कमी आहे. कारण, इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात टॅरिफ खूप जास्त आहे, असे ट्रम्प म्हणाले. रशियासोबत तर आमचा व्यापार नसल्यात जमा आहे. तो तसाच ठेवायला मला आवडेल,’ असेही ट्रम्प म्हणाले.

तुम्ही डेंजर झोनमध्ये प्रवेश करताय!

युव्रेन विरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठी रशियाला अल्टिमेटम देणाऱया ट्रम्प यांची रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी खिल्ली उडवली होती. त्यांच्यावरही ट्रम्प यांनी निशाणा साधला. ‘स्वतःला अजूनही अध्यक्ष समजणाऱया मेदवेदेव यांनी शब्द जपून वापरावेत. ते डेंजर झोनमध्ये प्रवेश करतायत,’ असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

डोनाल्ड ट्रम्प हे ‘झोंबी’ प्रेमी

रशियाला डेड इकॉनॉमी म्हणणाऱया ट्रम्प यांना रशियाचे माजी अध्यक्ष मेदवेदेव यांनी खोचक उत्तर दिले. ‘ट्रम्प हे ‘झोम्बी’ स्टाइल सिनेमांच्या प्रेमात असावेत. एखादा काल्पनिक ‘मृत हात’ त्यांना घाबरवत असेल. अमेरिकेचे अध्यक्ष इतके थयथयाट करतात याचा अर्थ रशिया योग्य ट्रकवर आहे, असे मेदवेदेव म्हणाले. रशिया याच दिशेने पुढे जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.