नदालचा ‘दस का दम’! इटालियन ओपन टेनिस स्पर्धा दहाव्यांदा जिंकली

लाल मातीवरील कोर्टवर ‘किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱया स्पेनच्या रफाएल नदालने रविवारी रात्री सर्बियाच्या नोवाक जोकोवीचचे कडवे आव्हान 7-5, 1-6, 6-3 अशा तीन सेटमध्ये परतवून लावले आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. रफाएल नदालचे इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे हे दहावे जेतेपद ठरले हे विशेष. 24 मेपासून सुरू होणाऱया फ्रेंच ओपन या प्रतिष्ठsच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलकडे बघितले जात होते. आता रफाएल नदाल व नोवाक जोकोविच हे दोन्ही खेळाडू फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.

तरीही जोकोवीच पुढे

रफाएल नदाल व नोवाक जोकोवीच यांच्यात आतापर्यंत 57 लढती झालेल्या आहेत. रफाएल नदालने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्बियाच्या टेनिसपटूला हरवले. रफाएल नदालचा नोवाक जोकोविचवरील हा 28वा विजय ठरलाय. याचप्रसंगी नोवाक जोकोवीच याने रफाएल नदालला 29 वेळा हरवले आहे. क्ले कोर्टवर मात्र रफाएल नदालने नोवाक जोकोवीचला 26 लढतींपैकी 19मध्ये पराभूत केले आहे.

खणखणीत चौकार

रफाएल नदाल याने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत दहा वेळा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. चार एटीपी स्पर्धांचे दहा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा जेतेपद पटकावणारा रफाएल नदाल हा एकमेव टेनिसपटू ठरलाय. स्पेनच्या या पठ्ठय़ाने मोण्टे कार्लो स्पर्धा 11 वेळा जिंकलीय. बार्सिलोना ओपन स्पर्धेत 12 वेळा बाजी मारलीय. तसेच फ्रेंच ओपन स्पर्धा 13 वेळा जिंकण्याची करामतही त्याने करून दाखवलीय.

बिग थ्रीचे वर्चस्व

रॉजर फेडरर, रफाएल नदाल व नोवाक जोकोवीच या बिग थ्री टेनिसपटूंचे वर्चस्व टेनिसविश्वात गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. रॉजर फेडररने विम्बल्डन स्पर्धा आठ वेळा जिंकलीय. रफाएल नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद 13 वेळा पटकावलेय. नोवाक जोकोवीच याने नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन आपल्या नावावर केले आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेत मात्र तिन्ही खेळाडूंचे जवळपास एकसारखेच प्रदर्शन दिसून येत आहे. रॉजर फेडररने पाच वेळा, रफाएल नदालने चार वेळा आणि नोवाक जोकोवीचने तीन वेळा अमेरिकन ओपन स्पर्धेवर हक्क सांगितलाय.

आपली प्रतिक्रिया द्या