साप हा मानवाचा मित्रच! कॉसमॉस हायस्कूलमध्ये नागपंचमीनिमित्त कार्यक्रम

सध्या टीव्ही मालिका, सिनेमांमधून सापांबाबत चुकीच्या गोष्टी दाखविल्या जात आहेत. त्यांचा विपरित परिणाम विद्यार्थी आणि पालकांवर होतो. हा गैरसमज घातक असून त्या दूर करण्यासाठी बोरिवली पूर्वेतील कमलाकर एज्युकेशनल ट्रस्टचे कॉसमॉस हायस्कूल मराठी माध्यमिक विभागातर्फे नागपंचमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सापांविषयी भीती दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सर्प हे मानवाचे शत्रू नसून मित्रच आहेत. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सापांमुळे फायदा मिळतो तसेच संपूर्ण मनुष्यजातीस त्याची उपयुक्तता आहे हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. साप म्हणजे भयंकर प्राणी असून त्याविषयी माहितीऐवजी गैरसमज पसरले आहेत. साप मनुष्याचा सूड घेण्यासाठी त्यांच्यामागे लागतो अशा अनेक अंधश्रद्धा समाजात पसरल्या आहेत. साप हा मुनष्याचा मित्र असून त्याच्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कॉसमॉस शाळेत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन कर्मचारी वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विषारी, बिनविषारी सापांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका-कुशंका दूर केल्या. या वेळी विद्यार्थ्यांनीही अनेक प्रश्न विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा तिवरेकर व शिक्षक उपस्थित होते.