मुसलमानांची लोकसंख्या वाढते आहे! सरसंघचालक मोहन भागवत

”आम्हाला अशी संस्कृती नको जी विभाजन वाढवते, परंतु अशी संस्कृती जी राष्ट्राला एकत्र बांधते आणि प्रेमाला प्रोत्साहन देईल”, असं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 96 व्या स्थापना दिनानिमित्त संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ”मंदिर, पाणी, स्मशानभूमी एक असावी. भाषा अशी असावी की ज्याने समाज जोडला जाईल. समाजात भेदभाव निर्माण करणारी भाषा नसावी. नव्या पिढीला इतिहास माहित असावा. स्वातंत्र्याबरोबरच आम्हाला फाळणीचे दुःखही मिळाले आहे.”

भागवत म्हणाले, ”वाढत्या लोकसंख्येमुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.” ते म्हणाले, ”1951 ते 2011 दरम्यान लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये प्रचंड फरक आला आहे. देशात मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण 9.8 टक्के वरून 14.23 टक्के झाले आहे. लोकसंख्या धोरण असायला हवं. याचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे आम्हाला वाटते. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून एक धोरण बनवले पाहिजे आणि ते धोरण सर्वांना समानतेने लागू केले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे लोकसंख्या ही एक समस्या बनत आहे, त्याचप्रमाणे लोकसंख्या असंतुलन ही देखील देश आणि जगात एक समस्या बनत आहे. यामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना नाही.”

सरसंघचालक म्हणाले, ”स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येक वर्गातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. आता पुन्हा समाजात अंतर निर्माण झाले आहे.” ते म्हणाले, ”गांधींनी मीठ मुठीत घेऊन सत्याग्रह सुरू केला. परदेशी लोकांनी आपल्या कमकुवत समाजाचा फायदा घेतला. एकता आणि अखंडतेची पहिली अट म्हणजे समाज मजबूत असणे.”

मोहन भागवत म्हणाले आहेत की, ”स्वतंत्र हिंदुस्थानचे चित्र कसे असावे, हिंदुस्थानच्या परंपरेनुसार, समतेच्या कल्पनेला ध्यानात घेऊन, देशातील सर्व प्रदेशांतील सर्व जातींच्या नायकांनी तपस्या, त्यागाला अनुसरून.” तसेच देशाची फाळणी, हा एक दुःखद इतिहास आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

नागपूरमध्ये आयोजित या कार्यक्रमात भागवत म्हणाले, ”ज्यांना समानतेवर आधारित समाजाची निर्मिती हवी आहे, त्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामाजिक सलोख्याच्या उपक्रमांद्वारे सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे काम संघाचे स्वयंसेवक करत आहेत.” ते पुढे म्हणाले, ”या वर्षी श्री गुरु तेग बहादूर जी महाराजांचा 400 वा प्रकाश पर्व आहे. धार्मिक कट्टरतेच्या विरोधात उभे राहिल्याने ते शहीद झाले. ते हिंदुस्थानात खूप लोकप्रिय होते. “हिंद की चादर” किंवा “हिंद की शील्ड” या पदवीने त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.”

सोशल मीडियावर बोलताना भागवत म्हणाले, ”तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाहीये. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येतं? आता करोना काळात तर लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आलाय. ऑनलाईन काय पाहायचं, काय नाही याचं काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचं याचंही नियंत्रण नाही.”

ड्रग्जसह वेगवेगळ्या नशेच्या व्यसनाबद्दल बोलताना भागवत म्हणाले आहेत की, “देशात वेगवेगळ्या नशेचे पदार्थ येतात त्याचं व्यसन वाढत आहे. ते कसं रोखायला हवं हे माहिती नाही. उच्च वर्गापासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत भयंकर व्यसनाचं प्रमाण आहे. या नशेच्या पदार्थांच्या व्यापारातून आलेला पैसा कुणाच्या हातात जातो हे सर्वांना माहिती आहे. देशविरोधी कामात त्याचा उपयोग होतो. सीमेपलिकडील देश या नशेच्या पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन देतात. असं सर्व सुरू आहे.”