आईवडिलांच्या आत्महत्येनंतर, विवाहित मुलीचा पतीसह जीवन संपविण्याचा प्रयत्न

330

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने गडचिरोलीतील मुलीच्या कुटुंबाने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना सोमवारीच समोर आली. ही बातमी जेव्हा विवाहित मुलीपर्यंत पोहचली तेव्हा तिनेही तिच्या पतीसह विषप्राशन करुन नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. चार्मोशी तालुक्यात असलेल्या पोहर नदीत हे नवदांपत्य उडी मारुन जीव देणार होते; मात्र पोलिसांनी वेळीच तेथे पोहोचून या दोघांनाही रोखले. या दांपत्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आनंदनगर या ठिकाणी राहणाऱया रवींद्र वरगंटीवार, त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगा साई या तिघांनी शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याची बाब या कुटुंबाला सहन झाली नाही. त्याचमुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली. रवींद्र वरगंटीवार यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला अशी फिर्याद भावेश वरगंटीवार याने दिली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले होते.

पोलिसांच्या दक्षतेने वाचले दोन जीव

आई, वडील व भावाच्या आत्महत्येची घटना नुकतेच लग्न झालेल्या वरगंटीवार यांच्या मुलीला समजताच ती अतिशय दुःखी झाली. तिच्या पतीलाही आपल्या कृत्यामुळे तिघांचा जीव गेल्याचे दुःख झाल्याने दोघेही तणावात होते. वरगंटीवार यांच्या मुलीने आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची ऑडिओ क्लीप पोस्ट केली. त्यानंतर ते घरातून निघून गेले. ही बाब गडचिरोली पोलिसांना समजली. त्यानंतर तातडीने या दोघांचा शोध पोलिसांनी सुरू केला. दोघांनीही विषारी औषध घेतले होते. त्यानंतर ते नदीत उडी मारून आयुष्य संपवणार होते. मात्र वेळीच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी या दोघांचा जीव वाचवला.

आपली प्रतिक्रिया द्या