बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी हा आदेश दिला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, तपास अंमलदार यांनी प्रथमदर्शनी गोळा केलेला तांत्रिक पुरावा, साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली होती. बोठे हा या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तेव्हापासून तो फरार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणीच्या वेळी बोठे याला समक्ष हजर राहण्याचा आदेश देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर काल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.

बोठे याच्यावतीने ऍड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला होता. या प्रकरणात द्वेषातून बोठे याचे नाव गोवल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लेखी पुराव्यांचा समावेश असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. यावर आज निर्णय देत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे पसार असलेल्या बोठे याच्यासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

बोठेच्या अटकेनंतरच समजणार हत्येचे कारण

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार बाळ बोठे पसार झालेला आहे. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे बोठेच्या चौकशीतूनच समोर येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे.

पाच पथके मागावर

रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणात नाव आल्यापासून बाळ बोठे पसार झालेला आहे. सुमारे 12 दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. परंतु तो अद्यापि पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांचे एक पथक परराज्यातही गेल्याचे सांगण्यात आले आहे.

अटकपूर्व जामीन फेटाळण्याची कारणे

घटनेच्या अगोदर एक महिन्यापासून अर्जदार, अटक आरोपी व मृत हे सतत संपर्कात असल्याचे मोबाईल कॉल रेकॉर्डवरून दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुह्यादरम्यानच्या हालचालींवरून व गुह्यामध्ये साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून अर्जदार व आरोपींचा गुह्याशी संबंध असल्याचे दिसून येत आहे. या गुह्यामध्ये अटक केलेल्या आरोपीकडून सहा लाख 20 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम अर्जदाराविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावा दिसून येत असून, अर्जदाराचा या गुह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते. गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱया दिवसापासून अपराधीपणाचे बोट अर्जदाराकडे जात असल्याचे दिसून येते. घटना गंभीर स्वरूपाची असून, मृताची गळा चिरून हत्या केलेली आहे. या गुह्यात चुकीच्या पद्धतीने, सुडाच्या भावनेने गोवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपीचे म्हणणे न्यायालयाने फेटाळले आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, तपास अंमलदार यांनी प्रथमदर्शनी गोळा केलेला तांत्रिक पुरावा, साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून अर्जदार बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.