
काष्टी ते बेलवंडी डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत काष्टी ते बेलवंडी 24 किलोमीटर अंतराची चाचणी मंगळवारी (दि. 18) घेण्यात आली. लवकरच नगर ते दौंडपर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात डिझेल इंजिनचा वापर होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नगर ते दौंड द्रुतगती रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते मनमाड चौथ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली. नगर ते मनमाडमधील 43 किलोमीटर डबल लाईन रेल्वेमार्गाची चाचणी घेण्यात आली होती. मनमाड ते दौंड रेल्वेमार्गात नगरच्या रेल्वेस्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच, सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाडय़ांना थांबा घ्यावा लागत होता. तासन्तास रेल्वेगाडी एकाच जागेवर थांबवून ठेवावी लागत होती. मात्र, आता हा पूर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे रेल्वेगाडय़ांचा विनाकारण थांबा आता बंद होणार आहे. तसेच, या कामामुळे रेल्वे ताशी 120 प्रतिकिमी वेगाने धावणार आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंतचे काम पूर्ण होणार आहे. मंगळवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनीअर अजय राणा, सेक्शन इंजिनीअर आर. डी. सिंग, इंजिनीअर प्रशांत कुमार या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी पूर्ण करण्यात आली.
काष्टी ते बेलवंडी डबल लाईन रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल.
– दीपक कुमार, उपमुख्य अभियंता (बांधकाम).























































