
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सध्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचे ग्रहण लागले आहे. या विभागात गेले सहा महिने ते वर्षभरापासून कार्यकारी अभियंता ते उपअभियंता यांची पदे रिक्त आहेत यामुळे या विभागाचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे.
नगर जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. जिल्ह्यात नव्याने पाणी योजना तयार करून त्यांची उभारणी करणे, पाणी योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसह अन्य कामे या विभागाच्या वतीने करण्यात येतात. या विभागाचे जिल्ह्यात ग्रामीण भागात कामकाज सुरळीत करण्यासाठी सात विभाग आहेत. या सात विभागांतील सहा विभागांत उपअभियंत्यांची पदे रिक्त आहेत. यात राहुरी, संगमनेर, पारनेर, श्रीरामपूर आणि जामखेड यांसह अन्य एका विभागात अधिकारी नाहीत.
पाणीपुरवठा विभागातील उपभियंत्यांच्या पदावर शाखा अभियंत्यांना चार्ज देण्यात आलेला आहे. यासह जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता पदावर श्रीरामपूर विभागाचे उपअभियंता प्रकाश खताळे यांना प्रभारी चार्ज देण्यात आला होता. साधारण आठ ते दहा महिने त्यांनी त्याठिकाणी प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून काम केल्यानंतर मागील आठवडय़ात त्यांची पुणे जिल्हा परिषदेत पदोन्नतीने बदली झालेली आहे. यामुळे हे पददेखील आता रिक्त झाले आहे. यासह पाणीपुरवठा यांत्रिकी विभागातील दोन पदांपैकी एक पद रिक्त असून, भूजल सर्वेक्षण विभागातील कनिष्ठ भू-वैज्ञानिकांची दोन पदे आणि सहायक भू-वैज्ञानिक यांचे एक पद रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे पाणीपुरवठा विभागाचा गाडा हा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात 1999 पासून नव्याने इंजिनीअर पदाची भरती झालेली नाही. यामुळे या ठिकाणी कामकाज करणे कठीण झाले असल्याचे काही उपअभियंत्यांनी सांगितले. सरकार पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करत असून, त्या कर्मचाऱ्यांना अनुभव नसून त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासकीय सेवेतील आणि अनुभवी इंजिनीअर यांची पदोन्नती झाल्यावर ते बदलून गेल्यानंतर पाणीपुरवठा विभागात कामकाजाचा मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण होणार आहे.



























































