
नगर मर्चंट्स बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक विभागाने आज अंतिम मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार 17 हजार 508 मतदार संख्या आहे. दहा ते पंधरा दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
नगर मर्चंट्स बँकेच्या एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. हस्तीमल मुनोत यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सत्ताधारी मंडळाकडून निवडणूक प्रचारास सुरुवातदेखील करण्यात आलेली आहे. मर्चंट्स बँकेसाठी 21 डिसेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर काही हरकती दाखल झाल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक विभागाने आज बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 17 हजार 508 मतदारांचा समावेश आहे.
बँकेची मागील निवडणूक 4 ऑक्टोबर 2015 रोजी झाली होती. त्यावेळी 17 पैकी 16 जागांवर हस्तीमल मुनोत यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने वर्चस्व मिळविले होते. संचालक मंडळाची मुदत 2020 मध्ये संपली होती. परंतु, कोरोनामुळे वेळोवेळी मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला होता; परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमुळे 20 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलल्या होत्या. त्या टप्प्यापासून प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मतदार यादी कार्यक्रम पुन्हा जाहीर होऊन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.



























































