समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांतील कुटुंबांना दर्जेदार धान्य मिळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. ई-पॉश मशिनचे सर्व्हर धीम्यागतीने चालत असल्याने धान्य वितरण ठप्प झाले आहे. धान्यासाठी लाभार्थी स्वस्त धान्य दुकानापुढे रांगा लावून बसत आहेत. मात्र, धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ई-पॉश मशिनमुळे जिह्यात धान्य वितरणाचा तिढा कायम आहे.
गरीब आणि दुर्बल गटांतील लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ, किफायतशीर दरामध्ये उपलब्धतेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013च्या तरतुदी करण्यात आल्या. गरीब आणि दुर्बल कुटुंबांतील व्यक्ती या रोजगारासाठी बऱयाचदा बाहेरगावी असत. त्यामुळे त्यांच्या नावावरील धान्याचा गैरप्रकार होत होता. केंद्र शासनाने 2019 मध्ये ई-पॉश मशिनद्वारे धान्य देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील व्यक्तींचा ठसा या मशिनवर घेतल्यानंतर धान्य देता येते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे आणि प्राधान्य कुटुंबांतील व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून कोरोना साथीच्या काळात मोफत धान्याचा पुरवठा केला. अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला 35 किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये गहू 15 किलो, तर तांदूळ 20 किलो दिला जातो. जिह्यात 87 हजार 703 अंत्योदयचे शिधा पत्रिकाधारक आहेत.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो धान्य दिले जाते. गहू 2 किलो, तर तांदूळ 3 किलो दिले जात आहेत. जिह्यात 6 लाख 36 हजार 817 शिधापत्रिकाधारक आहेत. 25 लाख 47 हजार 535 लाभार्थी आहेत. जिह्यात 7 लाख 24 हजार 520 कुटुंबांतील 29 लाख 36 हजार 707 सदस्यांना या योजनेतून धान्य मिळत आहे. एक हजार 887 स्वस्त धान्य दुकानांमार्फत हे धान्याचे वाटप केले जात आहे.
गेल्या महिन्यापासून जिह्यातील 7 लाख 24 हजार 520 कुटुंबांतील 29 लाख 36 हजार 707 व्यक्तींना धान्य मिळणे बंद झाले होते. तो पर्यंत पुरवठा विभागाला ‘आयएमपीडीएस पोर्टल’द्वारे ऑफलाइन पद्धतीने धान्यवाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने वाटप करण्यास नकार दिला. आता चार-पाच दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ई-पॉशचे सर्व्हर धीम्यागतीने चालत असल्याने धान्य वितरण करण्यास अडथळा होत आहे. ई-पॉश मशिनचे सर्व्हरमध्ये 15 जुलैपासून तांत्रिक बिघाड झाला. दिवसभरात एका दुकानातून सरासरी पाच ते सहा शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्यवाटप थांबविले.
राज्यपातळीवरच ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया किचकट होती. आता पुन्हा सर्व्हर सुरू झाले असून, काही जिह्यात काही ठिकाणी वाटप केले आहे. आता पुन्हा सर्व्हर धीम्यागतीने चालत असल्याने धान्य वितरणास अडथळा येत आहे.
– हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर.