भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगताप यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार शनिवारी (10 ऑगस्ट) रात्री 9 च्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात घडला. पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगताप यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जगताप यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत जगताप यांची विचारपूस केली. प्रवीण जगताप यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागचे कराण अजून समजलेले नाही. अधिक तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.