नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे शुक्रवारी मध्यरात्री 12.30 ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तीन अपघात झाले. यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले. या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी एका दुकानासह वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पहिला अपघात शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजता झाला. चेन्नई येथून माल घेऊन गुजरातला निघालेल्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याकडेला नव्यानेच सुरू झाल्याने हार्डवेअरच्या दुकानात घुसली. त्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले.
दुसरा अपघात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. मुंबईहून एक मालट्रक नगरमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना घाटात ब्रेक नादुरुस्त झाले. त्यामुळे ती समोर भाजीपाला घेऊन चाललेल्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यातच पुढे तो टेम्पो तामीळनाडू येथील अपघातग्रस्त ट्रक दिसून न आल्याने त्यावर जाऊन आदळला. तिसरा अपघात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला असून, समोरचे अपघातग्रस्त वाहन न दिसल्याने एक ट्रक त्यावर जाऊन आदळला.
या अपघातामध्ये वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर चार तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
उपाययोजना करा, सात गावांचे ठराव
या ठिकाणी दर आठ दिवसाला एकतरी अपघात होत असतो. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, या मागणीचा ठराव परिसरातील वांजुळी, खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, उदरमल, आव्हाडवाडी, इमामपूर ग्रामपंचायत यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास देणार आहेत. यापूर्वीदेखील अनेक वेळा संबंधित बांधकाम विभागास ठराव देऊनही कारवाई केली जात नाही. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.