
आर्थिक गैरव्यवहारांमध्ये अडकलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी आज तडकाफडकी अध्यक्षपदासह संचालकपदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा राजीनामा त्यांनी बँकेच्या महाव्यवस्थापकांकडे सादर केला आहे.
नगर अर्बन बँकेत आजवर अनेक घोटाळे उघड झाले आहेत. भाजपचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कामकाज सुरू केले होते. त्यावेळेपासून बँकेतील अनेक गैरव्यवहार उघड झाले आहेत. याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचा तपास सुरू आहे.
मागील वर्षी प्रशासक गेल्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक पार पडलेली होती. या निवडणुकीमध्ये गांधी गटाची एकहाती सत्ता आली होती. सध्या बँकेचा एनपीए 35 टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध घातले असून, कामकाज करण्यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने विद्यमान संचालक मंडळाने पावले उचलण्यास सुरुवातही केली होती.
बँक आर्थिक घोटाळ्यात सापडल्यामुळे अनेक सभासदांनी त्यांच्या ठेवी काढून घेतलेल्या होत्या. अनेकांनी आपले कर्जही मिटविले होते. दुसरीकडे अनेकजणांकडे आजही कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. त्याची रक्कम सुमारे 300 कोटी रुपयांच्या घरामध्ये गेलेली आहे. यामुळे बँकेची आर्थिक घडी विस्कटली होती. अध्यक्ष अग्रवाल यांनी बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वसुली होत नसल्याने अंतर्गत कलह वाढत गेला होता. अध्यक्षांवर दबाव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज अग्रवाल यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या संदर्भात अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.



























































