राजकीय संस्कृती, पक्षांतर, निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील अन्याय … भाजप नेत्याच्या निवृतीच्या निर्णयामुळे राजकीय वर्तृळात खळबळ

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वातावरणात उलथापालथ होत असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संदीप जोशी यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे नागपूरात भाजपकडे एकतर्फी सत्ता असताना त्यांच्याच आमदाराने पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आता मला थांबायचंय…!

सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र लिहून संदीप जोशी यांनी “आता मला थांबायचंय!” म्हणत आपल्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. 55 व्या वर्षी राजकारणाला ‘रामराम करत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर आणि वाढलेली स्पर्धा यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता हे या निर्णयामागील एक मुख्य कारण असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

स्वतःची जागा रिकामी करून तरुण रक्ताला संधी देणे काळाची गरज असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. त्यांच्या आमदारकीची मुदत 13 मे रोजी संपत असून, त्यानंतर ते पुन्हा पद मागणार नाहीत किंवा पक्षाने दिले तरी स्वीकारणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नसून सखोल विचारांती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

निवृत्तीनंतर संदीप जोशी हे क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत राहतील. राजकारण हे केवळ समाजसेवेचे माध्यम होते, पद किंवा प्रतिष्ठा महत्त्वाची नव्हती, असे सांगत त्यांनी आपल्या या निर्णयाने कुटुंब आणि कार्यकर्त्यांना झालेल्या धक्क्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.