…तर नागपुरात संचारबंदीसह 15 दिवस कडक लाॅकडाउन, महापालिका आयुक्त मुंढेंचा इशारा

नागपुरात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सध्याची रूग्णसंख्या पाहता याच वेगाने रूग्णसंख्या दहा हजारावर जाण्यास वेळ लागणार नाही. नागपुरकरांनी वर्तणुकीत सुधारणा न केल्यास कर्फ्यूसह पंधरा दिवस कडक लाॅकडाउन लावण्याचा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. यात हेल्थ इमर्जंसी सोडून कोणालाही परवानगी देणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

चौदा पंधरा दिवसाचे कडक लाॅकडाउन केल्यामुळे कोरोना संपेल असे नाही. परंतु कोरोनाची साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी वर्तणूक सुधारून कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. वर्षभर लाॅकडाउन ठेवू शकत नाही. पण, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने नियमांचे कसोशिने पालन करणे गरजेचे आहे.

मृत्यूची वाढती संख्या चिंताजनक आहे. लोक खूप बेफिकीरीने वागत आहे. 37 पैकी 9 प्रकरणात मृत्यू दोन दिवसात झाले आहे. याचाच अर्थ लोक माहिती लपवून ठेवीत आहेत. दोन कुटुंबातील दोन व्यक्ती मरण पावल्या आहे. म्हणजे या स्टेजवर येईपर्यत घरातील व्यक्ती माहिती न देणे गंभीर आहे. 24 तासात कोरोनामुळे नवरा बायको मरण पावले. अनेकांनी ताप आल्यावर खासगी रूग्णालयात उपचार केले. पण, महापालिकेला कोणीही माहिती दिली नाही. हा प्रश्न एकट्या प्रशासनाचा वा सरकारचा नाही. तर सगळ्यांचा आहे, हे समजून घ्यावे असे मुंढेंनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या