
नागपूरच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे. भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी घर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी भाजप पक्षाविरुद्ध केलेली बंडखोरी. एका बाजूला पक्षाप्रति असलेली निष्ठा आणि दुसऱया बाजूला पतीचा निर्णय, अशा कात्रीत सापडलेल्या माजी महापौरांनी पक्षनिष्ठsला प्राधान्य मानले आहे. मात्र यामुळे अनेक वर्षांचा एक संसारच संकटात सापडला आहे.
भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे विनायक डेहनकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. मात्र अर्चना डेहनकर यांना पतीचा हा निर्णय पटलेला नाही. अर्चना यांना 2009 ते 2012 या काळात भाजपने महापौरपद दिले होते, त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणे त्यांना चुकीचे वाटते. याच मुद्दय़ावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि अर्चना डेहनकर यांनी घर सोडले.
कोण आहेत डेहनकर पती–पत्नी?
विनायक डेहनकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या भागात त्यांनी पक्ष वाढवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या वॉर्डात महिला आरक्षण आले तेव्हा त्यांची पत्नी अर्चना यांना पक्षाने संधी दिली आणि त्या महापौरही झाल्या. मात्र गेल्या काही काळापासून पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना विनायक यांच्या मनात आहे. प्रभाग 17मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मनोज साबळे यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यामुळे विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केली.
पत्नी करणार पतीविरुद्ध प्रचार
आता माहेरी भावाकडे गेलेल्या अर्चना डेहनकर यांनी भाजपसाठी आणि पतीविरुद्ध प्रचार करण्याचा निर्धार केला. अर्चना डेहनकर यांनी पतीवर दबाव निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय. मात्र विनायक डेहनकर हे निर्णयावर ठाम राहतात का, हे 2 जानेवारीला म्हणजे उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.





























































