नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला घरात कोंडलं

महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराजांनी बंडाचे निशाण फडकवले. राज्यातील 29 महापालिकांत जवळपास सर्वच पक्षांत कमी अधिक प्रमाणात बंडखोरी दिसून येत आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने या बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मिनतवाऱ्या आणि धावपळ सुरू आहे. अर्ज माघारी घेण्यास अवघे काही तास बाकी असताना नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला घरात कोंडून ठेवले आहे.

नागपुरात भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांना समर्थकांनी घरात डांबून ठेवले आहे. अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी गावंडे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावले आणि त्यांना डांबून ठेवले. पक्षाकडून त्यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.

2017 मध्येही चारही उमेदवार दुसऱ्या भागातून दिले होते. त्यामुळे यंदा एक तरी उमेदवार या भागातून द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यांची मागणी योग्य आहे. पक्षाने मला एबी फॉर्म दिला होता. पण पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. मी मागे घेण्यास जात होतो, पण कार्यकर्त्यांनी कुलूप लावले असून मला जाऊ देत नाही, असे किसन गावंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर त्यांच्या आईने माझ्या मुलाला लढू द्या, अशी मागणी केली.

नेमकं काय घडलं?

किसन गावंडे हे प्रभाग 13 (ड) मधील भाजपचे संभाव्य उमेदवार होते. पक्षाने दिलेल्या एबी फॉर्मवर किसन गावंडे व विजय होले या दोघांची नावे होती. मात्र अखेरच्या क्षणाला भाजपने किसन गावंडे यांना अर्ज मागे घ्यायला सांगितला. यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी किसन गावंडे यांना घरात डांबून ठेवले. हा प्रकार समोर येताच परिणय फुके यांनी किसन गावंडे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यानंतर गावंडे यांनी कार्यकर्त्यांना हात जोडले, पाया पडतो म्हणत कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना घराबाहेर पडता आले.