शरद पवारांनी केली नागपुरातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

472

परतीच्या पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱयाला मदतीची अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व अनिल देशमुख यांनी काटोल तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी बांधावर जाऊन केली. जाणता राजा स्वतः बांधावर आल्याचे पाहून शेतकऱयांनीही आपले दुःख त्यांच्यासमोर मनमोकळेपणाने मांडले. यावेळी शेतकऱयांनी आपण लवकर सत्ता स्थापन करून अडचणीत असलेल्या शेतकऱयांची सुटका करावी अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱयांनी गुरुवारी केली.

परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे जरी सुरू केले असले तरी ते योग्य पद्धतीने होत नसल्याच्या अनेक तक्रारी आता समोर येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत असल्याचे पाहून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे स्वतः शेतकऱयांची भेट घेऊन शेतात जाऊन पाहणी करत आहेत. पूर्व विदर्भाच्या दौऱयावर असतानाच त्यांनी गुरुवारी काटोल नरखेड तालुक्यातील शेतामध्ये जाऊन कापूस, संत्रा व इतर पिकांची पाहणी केली. यावेळी प्रत्येक शेतकऱयांसोबत त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी काटोल तालुक्यातील चारगाव, हातला, काटोल, खानगाव तर नरखेड तालुक्यातील नायगाव, भारसिंगी, घोगरा, खापा या गावांमधील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱयांनी मनमोकळेपणाने आपले दुःख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केले.

शेतकरी एकप्रकारचे अस्मानी संकट आल्याचे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त करीत शेतकऱयांनी घाबरून न जाता मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन दिले. लवकरच यावर आपण तोडगा काढणार असल्याचेसुद्धा यावेळी पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांच्यासोबत काटोल क्षेत्राचे आमदार अनिल देशमुख, आमदार ख्वाजा बेग, सुनील शिंदे, माजी आमदार आशीष देशमुख, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या