पानविक्री थांबल्याने पानमळ्यांवाले अडचणीत; उत्पादकांचे नुकसान

552

जालना जिल्ह्यातील पारध परिसरात बोटांवर मोजण्याइतके पानमळे शिल्लक आहेत. त्यातच आता कोरोनामुळे सर्वच पानमळ्यातील पानविक्री बंद असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कवडीमोल भाव, अस्मानी संकट, तर कधी रोगराई, गारपीट यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळ्यातील उत्पादन थांबवले आहे. आता फक्त हातावर मोजण्याइतकेच पानमळे शिल्ल्क आहेत. त्यातच आता कोरोनामुळे सर्वच पानमळ्यातील पानविक्री बंद असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

पारध येथील पान उत्पादक शेतकरी पानांचे पेटारे विक्रीसाठी नागपूर, भुसावळ, पुणे येथे पाठवीत असत. मात्र, आता तीन महिन्यांपासून कोरोना रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागवेली पानांची विक्री थांबली आहे. सर्व बाजार बंद आहे, निर्यात बंद आहे, त्यामुळे पानतांड्यात पाने तोडणीविना आहे. यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. भोकरदन तालुक्यातील पारध भागात आजही मसाला पान, पानांचा विडा याला मागणी आहे. पानटपरी चालक येथील पाने मोठ्या प्रमाणात विकत घेतात. यामुळे काहीप्रमाणात का होईना पानांची विक्री होत असे. मात्र आता पानटपऱ्याही बंद असल्याने पानांची विक्री बंदच आहे.

पानतांड्यात पाण्याचे नियोजन करणे, योग्य निगा राखणे, औषध फवारणी करणे, मजुरांकडून खुडई करून घेणे, शिवाय अन्य खर्च असा बराच खर्च पानतांड्याला येत असतो. मात्र आता विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार पानउत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते.त्यामुळे येथील पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच सध्या पाणतांडे लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने इतर पिकांप्रमाणे पानमळ्यांकडे लक्ष देण्याची गरज पानमळा उत्पादकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या