
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्यांचे वाटप सोमवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केले जाणार आहे. यामध्ये निवृत्त पोलीस, त्यांचे वारस व कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या 423 घरांचाही समावेश आहे. सुमारे दोन ते तीन पिढय़ांपासून 160 चौरस फुटांच्या लहानशा खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौरस फुटांच्या आलिशान 2 बीएचके घरात राहण्याचे स्वप्न ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साकार होणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामकरण करण्यात आले आहे.
या सुविधा मिळणार…
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीचे निर्माण होणार असून यामध्ये स्वतंत्र शाळेची इमारत, स्वतंत्र वेल्फेअर सेंटर आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन आदी सुविधा असणार आहेत. तसेच पुनर्वसन इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा, तीन मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया आणि प्रशस्त जिने असून सर्व सोयीसुविधांची ‘म्हाडा’तर्फे बारा वर्षे देखभाल केली जाणार आहे.
एप्रिलला 537 घरांचे काम पूर्ण होणार
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात दोन टप्प्यांत 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट ‘ब’ मधील 1401 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये 8 पैकी 5 पुनर्वसन इमारतींतील 864 घरांच्या चाव्या सोमवारी देण्यात येतील. उर्वरित 537 घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिलमध्ये ते पूर्ण होईल.
























































