
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासात नियोजित असलेले मैदान एका बाजूला आहे. पुनर्विकासानंतर या मैदानाचा लाभ ठराविक इमारतींनाच मिळू शकेल. तेव्हा हे नियोजित मैदान पुनर्विकासातील सर्व इमारतींच्या मध्यभागी ठेवावे. जेणेकरून सर्व इमारतीतील रहिवाशांसाठी ते सोयीचे ठरेल. तसेच पुनर्विकासात एका घरामागे एक पाकि&ंग द्यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.
नायगाव बीडीडीतील पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या काही मागण्या आहेत. यातील महत्त्वाची मागणी म्हणजे पुनर्विकासातील नियोजित मैदान सर्व इमारतींच्या मध्यभागी घेणे. या निवेदनाचे पत्र रहिवाशांनी गेल्या वर्षी स्थानिक लोकप्रतिनिधी व म्हाडा अधिकाऱ्यांना दिले. मात्र त्याचे उत्तर म्हाडाकडून मिळालेले नाही. या मागण्यांसाठी रहिवासी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत. तरीदेखील मागणी पूर्ण न झाल्यास रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
z नायगाव बीडीडी चाळीतील अ व ब ब्लॉकमध्ये मैदान हे सर्व बीडीडी चाळींच्या मध्यभागीच होते. ब ब्लॉकच्या पुनर्विकासात तेथे विक्रीच्या घरांसाठी म्हाडा बहुमजली दोन टॉवर बांधणार आहे. परिणामी तेथील मैदानाची रचना बदलली आहे. मात्र अ ब्लॉकमध्ये केवळ रहिवाशांसाठी इमारती बांधल्या जाणार आहेत. येथील मैदानाची रचना बदलण्याची आवश्यकता नाही, असेदेखील रहिवाशांचे म्हणणे आहे.
घरोघरी जाऊन सह्यांची मोहीम
पुनर्विकासातील मागण्यांसाठी घरोघरी जाऊन सह्यांची मोहीम राबवली जात आहे. प्रकल्पाची व मागण्यांची माहिती रहिवाशांना दिली जात आहे. संदीप चव्हाण, अॅड. मनोज टपाल, अनंत धनावडे, ललित जाधव व येथील अन्य सर्व चाळीतील रहिवासी ही मोहीम राबवत आहेत.
35 हजार भाडे द्यावे
येथील रहिवाशांना 30 हजार रुपये भाडे देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. हे भाडे अपुरे आहे. आसपासच्या परिसरात इतक्या किमतीत घर भाडय़ाने मिळणार नाही. तेव्हा किमान 35 हजार रुपये भाडे द्यावे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.


























































