नायरमधील आपुलकी आणि उपचारांमुळे कोरोनावर मात

688

कोरोना झाला म्हणजे सर्व संपले….उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले तर आजूबाजूच्या खाटांवर मृतदेह आणि उपचारांमध्ये होणारी हेळसांड…असे सर्वत्र चित्र निर्माण झालेले होते, पण तरीही खासगी रुग्णालयातील अपुऱया उपचारांना कंटाळून महापालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल झालो. रुग्णालयातील आपुलकी आणि उपचारांमुळे मी कोरोनावर मात केली…पालिकेच्या जी उत्तर विभागातील कर्मचारी विलास मारुती देसाई सांगत होते.

पालिकेच्या अत्यावश्यक सेवेत काम करताना देसाई यांनी कोरोनाची लागण झाली. उपचारांसाठी दहिसरमधील एका पॉश खासगी रुग्णालयात ते दाखल झाले. तब्येत सुधारण्याऐवजी खालावली. अखेर मित्रमंडळींच्या सल्ल्याने महापालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल झाले. या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या मनात प्रचंड धाकधूक होती. या तणावाखालीच ते नायर रुग्णालयाच्या वॉर्ड नं. 31 मध्ये दाखल झाले, पण ऐकले होते त्यापेक्षा वेगळाच अनुभव त्यांना आला.

कोरोना रुग्णाला पालिका रुग्णालयात कोणी स्पर्श करत नाही, शेजारी मृतदेह ठेवतात हे चित्र खोटे असल्याचे देसाई यांच्या लक्षात आले. रुग्णालयातील कर्मचाऱयांच्या आपुलकीमुळे देसाई कोरोनामुक्त झाले. त्यांना घरी पाठवले. रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रत्येक कर्मचाऱयाने केलेली सेवा, प्रत्येक रुग्णाची जातीने केलेली विचारपूस, दिलेला धीर यामुळेच माझ्यासारखे अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे देसाई यांनी आवर्जून सांगितले.

आम्ही घेतलाय वसा!
पालिका रुग्णालयाचे दर कमी असल्याने रुग्णांची गर्दी होती, पण डॉक्टर-नर्स अतिशय मनापासून काम करीत होते. त्यांची रुग्णसेवा औपचारिक नव्हती. देसाई यांच्या समोरच्या खाटेवरील एक वृध्द रुग्ण व्यवस्थित जेवत नव्हता तेव्हा दोन-तीन दिवस त्यांना एका नर्सने स्वतःच्या हाताने भरवले. त्यावर देसाई यांनी ‘‘तुम्हाला भीती नाही वाटत?’’ असा प्रश्न नर्सला केला. त्यावर ‘‘हा आम्ही घेतलेला वसा आहे’’ असे उत्तर नर्सकडून आले.

आपली प्रतिक्रिया द्या