
विरारमधील रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळून 17 जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेस आठवडा उलटत नाही तोच नाल सोपाऱ्यातील धोकादायक सभा अपार्टमेंट खचल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने तातडीने त्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले असून बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या 114 जणांचेदेखील अन्यत्र स्थलांतर केले आहे. दरम्यान धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या रेहमतनगर परिसरात 20 वर्षे जुनी सभा अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीत 40 कुटुंबे राहत आहेत. इमारत जुनी झाल्याने पालिकेने धोकादायक ठरवली होती. मात्र तरीही यात नागरिक वास्तव्य करीत होते. मंगळवारी दुपारी याच इमारतीच्या एका बाजूला दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानकपणे ती दुसऱ्या बाजूला कलंडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीती निर्माण झाली.
मदरसा, सभागृहात व्यवस्था
इमारत कलंडल्याचे समजताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यातील रहिवाशांना तातडीने बाहेर काढले. पालिकेने खचलेल्या इमारतीमधून 125 जणांना व त्याला लागूनच असलेल्या इमारतीमधून 114 जणांचे स्थलांतर केले आहे. त्यांची जवळच्या मदरसा व एका सभागृहात तात्पुरती व्यवस्था केली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.