पर्यटकांसाठी पर्वणी; तब्बल पाच वर्षानंतर नर-मादी धबधबे वाहू लागला

868
naldurg-nar-madi-waterfall

सोमवारी पहाटे पडलेल्या परतीच्या पावसामुळे बोरी धरणाचा सांडवा ओसंडून वाहत असल्याने नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबे तब्बल पाच वर्षानंतर खळाळून वाहू लागले आहेत. यापूर्वी हे धबधबे 2014– 15 मध्ये खळाळून वाहिले होते. त्यानंतर प्रथमच या धबधब्यांचा आनंद पर्यटकांना आता घेता येणार आहे. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यांतील नर-मादी धबधबे पाहण्याचा आंनद कांही औरच आहे. कारण, असा निसर्गरम्य देखावा पर्यटकांना आर्किषत केल्याशिवाय राहत नाही.

21 ऑक्टोबर रोजी पहाटे नळदुर्ग बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला आहे. दरम्यान या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरण पूर्णक्षमतेने भरून धरणाचा सांडवा मोठ्या प्रमाणात वाहत आहे. या सांडव्याचे पाणी बोरी नदीच्या पात्रात आल्यानंतर बोरी नदीही पूर्णक्षमतेने भरुन वाहत आहे. बोरी नदीचे पात्र हे किल्ल्यात वळविले असल्याकारणाने या नदीवर रणमंडळ आणि नळदुर्ग किल्ला यांना जोडणारा बोरी नदीच्या पात्रावर बांधलेल्या बंधाऱ्याला वरच्या बाजूने दोन ठिकाणी पाणी वाहण्यासाठी सोडण्यात आलेले सांडवे म्हणजेच नर-मादी धबधबे म्हणून ओळखले जातात. बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या किल्ल्यातील हे दोन्ही नर-मादी धबधबे वाहण्यास सुरुवात होते. या वर्षी सुरुवातीच्या पावसामुळे बोरी धरण भरेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु उत्तरा नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र मोठ्या प्रमाणात नळदुर्ग व बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरसल्यामुळे बोरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा लागून राहिली होती. मात्र बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ तीन फुटाची गरज आसताना पावसाने पुन्हा दडी मारली होती. आज पहाटे झालेल्या पावसामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

धरणाचा सांडवा वाहत आसल्याने ऐतिहासिक किल्ल्यातील नर मादी धबधबे ओसंडून वाहत आहेत. हे दोन्ही धबधबे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर किल्ला व नर- मादी धबधबे पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत असते. ऐन दिवाळीच्या तोंडावर नर मादी धबधबे सुरू झाले आहेत. आज पर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झाले आहे. नळदुर्गच्या बोरीधरणाचा सांडवा हा सप्टेबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटच्या आठवड्यात वाहत असतो. पंरतु या वर्षी 21 ऑक्टोबरला हा सांडवा वाहण्यास सुरुवात झाल्याने नर-मादी धबधबे दिवाळीच्या सणात सुरुवात झाले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या काळात हा पर्यटकांना पर्वणीच ठरणार आहे. कारण सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात नळदुर्गच्या एैतिहासिक किल्ल्यात आता पर्यटक नर-मादी धबधबे पाहून आनंद लुटणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य स्मारक संगोपन व जतन योजने अंतर्गत नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हा सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉन कंपनीने चालविण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे या कंपनीकडून या किल्ल्यात मोठया प्रमाणात पर्यटकांना सुविधा व सोयी निर्माण केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या