
पुणे शहरातील शनिवारवाड्याच्या आवारात शनिवारी नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
भाजप खासदाराचे आंदोलन शनिवारवाड्याच्या आवारात महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी व पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात रविवारी आंदोलन केले होते. दरम्यान, खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. कुलकर्णी या दोन धर्मांत तेढ निर्माण करत आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.