मिंधे-भाजपची गडबड त्यात अजित पवार गटाची फडफड; छत्री, कांदे वाटपाबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!

ऐरोलीमध्ये भाजपचे आमदार गणेश नाईक आणि मिंधे गटाचे विजय चौगुले आणि बेलापूरमध्ये भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात गडबड सुरु झाली असतानाच अजित पवार गटाने फडफड सुरू केली आहे. वाढदिवसानिमित्त छत्री वाटप आणि स्वस्त दरात कांदे विकण्याबरोबर प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे, धोकायदायक इमारती, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाकडे लक्ष द्या, असा टोला अजित पवार गटाचे नामदेव भगत यांनी संदीप नाईक आणि मिंधे गटाला लगावला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आता बेलापूरची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. या दोघांमध्ये सुरू झालेल्या आरोप आणि प्रत्यारोपाच्या संघर्षात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनीही आता उडी मारली आहे. काल रविवारी संदीप नाईक यांचा वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने विविध ठिकाणी छत्री वाटप, वह्या वाटप, नाष्ट्याचे वितरण आदी कार्यक्रम पार पडले. यावर नामदेव भगत यांनी उपरोधिकटीका केली आहे हे कार्यकम कराच, पण या बरोबर नवी मुंबईचे अनेक रखडलेले प्रश्न आहेत त्याकडेही लक्ष द्या. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित झालेली नाहीत. महापालिका, सिडको, एमआयडीसीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन रखडले आहे. त्याकडेही जरा लक्ष द्या, असा टोला भगत यांनी संदीप नाईक यांना लगावला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मिंधे गटाने स्वस्त दरात कांदे विकण्यास सुरुवात केली. कांदे विक्रीबरोबर त्यांनी महत्त्वाच्या समस्या मार्गी लावाव्यात असाही घरचा अहेर त्यांनी खोके सरकारला दिला आहे.