
>> नमिता दामले
रांगणा किल्ला म्हणजे रांगडे दुर्गरत्न. प्रसिद्धगड या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. कोकणातील सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूर या दोन्ही जिह्यांच्या सरहद्दीवर रांगणा किल्ला आहे. दोन्ही मार्गाने किल्ल्यावर जाता येते. कुडाळहून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर नारुर गाव आहे. आम्ही या वाटेने रांगणा किल्ल्यावर निघालो.
दिवस-1:ः कार्तिक पौर्णिमा- नारूर गावदेवीच्या जत्रेचा दिवस. डांबरी रस्ता संपल्यावर वनखात्याने उभारलेल्या किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेचे प्रवेशद्वार व छोटासा बगिचा लागला. रेलिंग वगैरे घालून काँक्रीटच्या प्रशस्त पायऱ्यांची सुरुवातीची वाट 15-20 मिनिटांत संपली. पक्ष्यांचे कुजन मंत्रमुग्ध करीत होते. बरीचशी वाट जंगलातून जाणारी आहे. रांगण्याला जायला देशावरून चिकेवाडीकडूनही वाट आहे. नारूर गावातून 2-3 वाटा आहेत.
रांगण्याचा विस्तार खूप मोठा आहे. चिकsवाडीकडून येणारी वाट गणेश दरवाजा व हनुमान दरवाजातून येऊन या मुख्य वाटेला कोकण दरवाजा गेल्यावर येऊन मिळाली. निंबाळकर बावडीचे अवशेष बघून पुढे गेल्यावर यशवंत दरवाजा लागतो. मग बारमाही पाणी आणि झाडी असलेले तळे. तळय़ाकाठी क्षणभर विसावलो, समाधींचे अवशेष बघून रांगणाईदेवी मंदिर गाठले. देवीच्या चरणी लीन झाल्यावर गाभाऱयात शांत वाटले. डोळय़ात भरणारी दीपमाळ बघून मारुतीरायाला नमस्कार करून मंदिराच्या मागची तटबंदी पकडून गडफेरीला सुरुवात केली. उंच गवत माजलेले होते. त्यातून वाट काढत थोडे पुढे गेल्यावर एक दरवाजा लागला. इथून खाली बहुतेक केरवड गावात वाट उतरत असावी, पण ती आता बंद आहे. आता हत्तीच्या सोंडेच्या शोधात निघालो. दाट झाडी आणि गवतात लपलेली चिंचोळी सोंड बघून बुरुजांकडे निघालो. वाटेत एक बुडालेला तलाव दिसला. बुरुजावरून खाली उतरून यशवंत दरवाजाकडे जाताना बुरुजाची चिलखत नजरेत भरली. शिवलिंग छोटय़ाशा देवळीत, पण त्यांचे पुत्र गणपती मात्र देवळात सुस्थापित होते. गणेशाची मनोभावे प्रार्थना करून आता मुक्कामाचे हनुमान मंदिर गाठायचे होते. उंच माजलेल्या गवतामुळे दिशेचा काही अंदाज येत नव्हता. वाटा तपासत मंदिरात पोहोचलो.
दिवस-2: शिलाहार राजा भोज याने बांधलेल्या या रांगणा किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. प्रसिद्धगड कोकण दरवाजाने उतरताना वाटेत एक छोटा धबधबा आणि पाण्यासाठी वाट करायला बांधलेली मोरी दिसली. जवळच्या सोंडेवरून नारूरला उतरण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि मग मुकाटय़ाने आल्या वाटेने परत उतरलो आणि आंबोली गाठले.
दिवस-3:ः आंबोलीजवळच्या गेळे गावातून वाटाडय़ा मिळाला नाही. वाट शोधत आम्ही नारायणगडाच्या दिशेने निघालो. गडाला जोडणाऱया धारेवर पोहोचेपर्यंत जरा चाचपणे सुरू होते. गवतात लपलेल्या पायवाटा दिसत नव्हत्या.
मोकळय़ा आभाळाखाली वास करणाऱया देवांनी जेव्हा दर्शन दिले तेव्हा भरून पावलो. या देवांच्या मागून निघालो तर पुन्हा असेच मांडलेले देव लागले. या टेपाडावरून जवळच नारायणगड होता. नारायणगडच्या झेंडय़ाला सलामी दिली. गडफेरी करताना काही बांधकामांचे भग्नावशेष, घराची जोती, चुन्याची घाणी वगैरे दिसली. थोडे चुकत-माकत परतताना एका रानगव्याची चाहूल लागली आणि एका उधळलेल्या वळूने घाबरगुंडी उडवली. आंबोली गाठल्यावर महादेवगड पॉइंटवरून अंतर्मुख करणारी संध्याकाळ अनुभवली.




























































