मोदी गो बॅक; नाना पटोले यांनी स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत, असे जाहीर करीत विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

यावेळी नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱयांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले. देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात आंदोलन छेडले जाईल. ‘काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार,’ असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जुलमी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; काँग्रेसच्या बैठकीत ठराव

गोपूळदास तेजपाल हॉलमध्ये राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठकही पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हेही उपस्थित होते. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू ठेवला आहे. नोटाबंदी, जीएसटीच्या अविचारी निर्णयासोबतच कोणतीही पूर्वतयारी न करता लॉकडाऊन लादण्यात आला. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, कोटय़वधी बेरोजगार झाले. मोदी सरकारने सामान्य जनतेवर अन्याय केला असून या जुलमी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ‘मोदी सरकार चले जाव’ असा ठराव काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.