नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले नाना पटोले यांनी आज अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर तेच प्रदेशाध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

नाना पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आज सुपूर्द केला. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रीपद तसेच विधिमंडळ पक्षाचे गटनेते पद असल्याने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी अशी मागणी काँग्रेसमध्ये होत होती. यासंदर्भात थोरात, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील तसेच अन्य नेत्यांची दिल्लीत बैठक झाली होती, मात्र योग्य उमेदवाराचे नाव अंतिम होत नसल्याने थोरातच कायम राहतील, अशीही चर्चा होती. मात्र पहिल्यापासून प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले नाना पटोले यांच्या काल झालेल्या दिल्लीवारीनंतर त्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पटोले हेच प्रदेशाध्यक्ष होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या मंत्र्यांची नावे चर्चेत होती.

तुम्ही राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘हा निर्णय तीन पक्षांचे नेते घेतील. तीन पक्षांचे प्रमुख यासंदर्भात बैठक करून निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळातच होते,’

विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा

काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

नवा विधानसभा अध्यक्ष कोण?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा विधानसभाध्यक्ष कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार हे ठाम असले तरी या पदासाठी अमित देशमुख यांचेही नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते अशी कुजबूज आहे. विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेस कुणाचे नाव पुढे करते याची उत्सुकता असतानाच विधानसभा अध्यक्षपदावर आता महाविकास आघाडीतील घटकपक्षांची पुन्हा चर्चा होईल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटल्याने एकूण राजकीय उत्सुकता ताणली गेली आहे.

पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रीपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही असे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितलेलं नाही. पक्ष आदेश देईल. त्याचं मी पालन करेन!