देशातील जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला: नाना पटोले

लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील 10 वर्षांच्या अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला ही मोठी चपराक आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असलेल्या महाराष्ट्राने खोक्याची व्यवस्था चालत नाही हे दाखवून दिले आहे. संविधानाला पायदळी तुडवत राज्यातील मविआचे सरकार पाडले, लोकशाही व संविधानाचा अपमान केला त्यांना जनतेने या निवडणुकीत चोख उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष एक नंबरचा करण्याचा संकल्प केलेला आहे, त्याची ही सुरुवात आहे. देशात नरेंद्र मोदींपेक्षा कोणी मोठा नाही, त्यांना कोणी अडवणार नाही या अहंकारी वृत्तीला जनतेने मोठी चपराक दिली आहे. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई पदयात्रेने देशातील चित्र बदलून टाकले व जनतेने राहुल गांधी यांना मोठे जनसमर्थन दिले. या पदयात्रेने नरेंद्र मोदींशिवाय देशात नेता नाही यालाही उत्तर दिले व राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर देशातील जनतेनेच शिक्कामोर्तब केले. लोकसभा निवडणुकीतील हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालय टिळक भवन येथे फटाके फोडून गुलाल उधळला व मिठाई वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, जोजो थॉमस, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे आदी उपस्थित होते.