धक्कादायक! आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही प्राण सोडले

ज्या आईने आपल्याला या जगात आणले,जगायला शिकविले तीच आई या जगातुन निघुन गेली. त्या आईच्या निधनाची बातमी समजताच मुलाला हा आघात सहन न झाल्याने मुलाचाही हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना नांदेडमधील कुंडलवाडी शहरातील वंजार गल्ली भागात घडली आहे.

कुंडलवाडी शहरातील वंजारी समाजातील ज्येष्ठ महिला बुधाबाई चिन्नोजी गंगोणे (वय 105) यांचे दि. 23 जानेवारी रोजी सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या निधनाची बातमी कळताच मुलगा अशोक चिन्नोजी गंगोणे (वय 75) यांना दुःख सहन न झाल्याने अवघ्या तीन तासानंतर रात्री 8.30च्या सुमारास आई पाठोपाठ मुलाचाही हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

या घटनेमुळे गंगोणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वंजारी समाज व कुंडलवाडी शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशोक चिन्नोजी गंगोणे हे येथील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील आडत दुकान येथे मुनीम म्हणून गेली अनेक वर्ष काम करत होते. आई व मुलावर नागणी रोडवरील स्मशानभूमीत दि.24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या