
श्री सप्तशृंग गडावर राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सुट्टीमुळे होणारी गर्दी विचारात घेता ट्रस्टच्या वतीने आज रविवारपासून 2 जानेवारीपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाताळ तसेच नववर्षानिमित्त असणाऱ्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळसह अनेक राज्यांमधून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे गडावर मोठी गर्दी उसळत आहे. श्री भगवतीच्या दर्शनाची नियमित वेळ पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत असते. मात्र, भाविकांचा ओघ लक्षात घेता या कालावधीत सर्वांना दर्शन घेणे शक्य होत नाही. ही गर्दी विभागली जावी, सहजतेने देवीचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले दरड प्रतिबंधात्मक कामही सध्या बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंग घाट रस्ताही 7 जानेवारी 2025 पर्यंत 24 तास सुरळीत सुरू राहणार आहे. दरम्यान, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील आहे.
धनुर्मास उत्सव उत्साहात
गडावर 16 डिसेंबरपासून धनुर्मास उत्सवास प्रारंभ झाला आहे, तो 13 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहील. इतर दिवशी नियमानुसार देवीची विधिवत पूजा सकाळी 9 वाजता संपन्न होते. मात्र, या कालावधीत प्रत्येक रविवारी पहाटे 5 वाजता देवीची पंचामृत महापूजा होते. सकाळी सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर येतात, त्यानंतर महाआरती केली जाते.