तिजोरीत खडखडाट असताना खोके सरकारने लाडकी बहीणसह अन्य योजना जाहीर केल्या असून योजनेचे श्रेय लाटण्याचा सपाटा भाजप, मिंधे गटाने लावला आहे. यासाठी राज्यभरात सरकारी पैशात स्वतःचे मार्केटिंग करण्यास सुरुवात केली आहे. नवामोंढा येथेही रविवारी लाडकी बहीण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सकाळपासून ताटकळत बसलेल्या भगणी येथील कांताबाई मोरे यांना भोवळ आली आणि रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत दोनवेळा रद्द झालेला नवामोंढा येथील कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता सुरू होणार होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 तास उशिरा आल्याने नांदेडला आल्याने महिलांना नवामोंढा मैदानावर ताटकळत बसावे लागले.
सकाळी 9 वाजल्यापासून महिला घराबाहेर पडल्या होत्या. मात्र कार्यक्रमस्थळी महिलांसाठी पाणी व जेवणाचीही व्यवस्था नव्हती. मुख्यमंत्र्यांना उशिर होत असल्याने व उपाशी राहिल्याने भणगी येथून आलेल्या कांताबाई यांना अस्वस्थ वाटू लागले. सायंकाळी चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान त्यांना भोवळ आली. कार्यक्रमस्थळी असलेल्या विशेष वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार करुन त्यांना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
कांताबाई यांच्या नातेवाईकांनी याचे खापर प्रशासनावर फोडले असून कार्यक्रम उशिरा सुरू होणार हे माहिती असतानाही आम्हाला सकाळपासून ताटकळत का ठेवले असा सवाल केला आहे. कांताबाई मोरे यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असून शासनाने त्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
सदर महिलेचा मृत्यू दुर्दैवी असून, आजच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘दै. सामना’शी बोलताना दिली.