
नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे देवस्थानाच्या यात्रेदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोक्यात दगड घालून २९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश किशनराव वडजे (वय २९) हा तरुण शेती करून आपला उदरनिर्वाह करत असे. ९ मार्च रोजी टेंभुर्णी येथे ग्रामदैवताची यात्रा असल्याने गावात उत्साहाचे वातावरण होते. रात्री गणेश आपल्या कुटुंबासह जेवण करून यात्रेकडे गेला असताना, त्याचा गावातीलच पप्पू उर्फ जैनराज सटवा सुताडे (३१) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या आरोपीने गणेशच्या डोक्यावर दगडाने भीषण प्रहार केला. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला कोसळला. रात्रीचा अंधार असल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही.
मंगळवारी १० मार्च रोजी सकाळी गावकऱ्यांना गणेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत गणेशचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे यात्रेच्या आनंदावर विरजण पडले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांक गौड, बिलोलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि नायगावचे पोलीस निरीक्षक मारकड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पप्पू उर्फ जैनराज सुताडे आणि शाम सटवा सुताडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पोमानाळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
टेंभुर्णी गावात यापूर्वीही हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर, या नवीन घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मयत गणेशच्या पार्थिवाचे नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सरपंच मुन्ना पाटील वडजे यांनी दिली.


























































