नांदेड – तीन मुलांसह पती पत्नीची आत्महत्या

सहस्त्रकुंड धबधब्याच्या परिसरात पाच जणांनी संपत्तीच्या वादातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यापैकी तिघांची मृतदेह पोलिसांना सापडली असून, दोघांचा शोध घेणे सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी इस्लापूरजवळील सहस्त्रकुंड धबधब्यात एक 42 वर्षाच्या इसमाचे प्रेत सापडले. गुरुवारी हे प्रेत प्रवीण भगवानराव कवाणकर (42) यांचे असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी पोलिसांना दिली. कवाणकर नातलगांनी सांगितल्याप्रमाणे 25 सप्टेंबर रोजी प्रवीण भगवानराव कवाणकर (42) त्यांची पत्नी अश्विनी (38), मुलगी शेजल (20), मुलगी समीक्षा (15) आणि मुलगा सिध्देश (13) हे सर्व जण मुरली यवतमाळ याठिकाणी आले. मुरली हा भाग सहस्त्रकुंड धबधब्याची दुसरी बाजू आहे. काही लोक सांगतात की, कवाणकर कुटुंबियांमध्ये संपत्ती संदर्भात भांडण सुरु होते. हदगावमध्ये असलेली कवाणकर कुटुंबियांची मोठी किराणा दुकान मागील आठ दिवसापासून बंद आहे. 25 सप्टेंबर रोजी प्रवीण कवाणकर व त्यांच्या पत्नी आणि तिन्ही मुलांनी सामुहिक आत्महत्या केल्याची चर्चा हदगाव शहरात होत आहे. सुशांत किनगे यांनी सांगितल्याप्रमाणे दराटी आणि बिटरगाव या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखीन दोन प्रेते सापडली आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी कवाणकर कुटुंबियांचे नातलग तिकडे गेलेले आहेत. अद्याप आणखीन दोन जणांचा शोध सुरु आहे. कौटुंबिक संपत्तीच्या वादातून झालेल्या या सामुहिक आत्महत्येने हदगाव शहरावर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या