Nanded नांदेडमध्ये पावसाची हजेरी, आता मात्र बळीराजाची चिंता वाढली

प्रातिनिधिक फोटो

नांदेड जिल्ह्यात पुन्हा काल सायंकाळी व रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र या पावसाने हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास मात्र आता वाया जाण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील ४५ मंडळात काल रात्री अतिवृष्टी झाल्याची नोंद असून, लोहा, हदगाव, देगलूर, अर्धापूर या तालुक्यात तसेच किनवट, माहूर परिसरात अनेक शेतात पाणी शिरले आहे. दरम्यान काल झालेल्या पावसामुळे आज सकाळी विष्णूपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून, प्रशासनाने गोदाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नांदेड जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी काल सायंकाळी व रात्री मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे जवळपास जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरले आहेत. पावसाची आवश्यकता शेतकर्‍यांना होती, मात्र या पावसाने झोडपून काढल्याने सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना त्याचा फटका बसला आहे. यावर्षी पिकांची स्थिती उत्तम असताना अचानक आलेल्या पावसामुळे व सलग दोन दिवस पाऊस झाल्याने बळीराजा मात्र हतबल झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात परवा रात्री म्हणजे ३१ च्या रात्री २६ मंडळात अतिवृष्टी झाली होती. आज ४५ मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदवल्या गेली आहे. यात नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, तुप्पा, वसरणी, विष्णूपुरी, लिंबगाव, तरोडा, वाजेगाव, नाळेश्वर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, जांब, बार्‍हाळी, मुक्रमाबाद, आंबुलगाव, दिग्रस, कुरुळा, लोहा, माळाकोळी, कापशी, सोनखेड, शेवडी, कलंबर, हदगाव, तळणी, मनाठा, तामसा, पिंपरखेड, आष्टी, भोकर, मरखेल, मालेगाव, हाणेगाव, नरंगल, मुदखेड, बारड, जवळगाव, अर्धापूर, दाभड, मालेगाव, कुटुंर, नरसी आणि मांजरम या नांदेड, बिलोली, मुखेड, लोहा, हदगाव, कंधार, देगलूर, मुदखेड, अर्धापूर व नायगाव तालुक्यातील मंडळांचा समावेश आहे.

आजही पावसाने दुपारपर्यंत उघडीप दिलेली नव्हती. त्यामुळे हदगाव ते किनवट, हिमायतनगर ते किनवट व किनवट ते यवतमाळ या मार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्प आहे.

दरम्यान विष्णूपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

देगलूर-तालुक्यात संततधार पाऊस चालूच असून, हवामान खात्याने दिलेला अंदाज शेतकर्‍यांसाठी चिंतेची बाब आहे. पावसाची अशीच अवकृपा राहिल्यास खरिप पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे चार मंडळात अतिवृष्टी झाली असून पाऊस थांबला नाही तर काही गावांचा संपर्क तुटू शकतो. मन्याड व लेंडी नदी दुथडी भरून वाहत आहे.

तालुक्यात गत शनिवारी रात्रीपासून पाऊस चालूच आहे. रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे चार मंडळात अतिवृष्टी झाली असून त्यात हणेगाव मंडळात ८१.२५ मि. मी, मरखेल मंडळात ७४.२५ मि. मी, माळेगाव मंडळात ७१. ०० मि. मी तर नरगंल मंडळात ६९.२५ मि.मी. पाऊस पडला आहे. काही शेतकर्‍यांनी मुगाच्या राशी करुन घेतल्या तर ज्या शेतकर्‍यांच्या मुगाच्या राशी झाल्या नाहीत त्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. उडीद, सोयाबीन व तूर पिकाची परिस्थिती चांगली होती. मात्र या पावसामुळे ही पिकेही धोक्यात आली आहेत. अनेक शेतात पाणी साचले असून पाऊस असाच राहिल्यास खरिप पिके शेतकर्‍याच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. मन्याड व लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या जमिनीतील पिके जाण्याची शक्यता आहे. सुगाव, मनसकरगा, सावरगाव, लख्खा, तुपशेळगाव या भागातील नाल्यातील पाणी वाढल्यास या गावांचा शहराशी संपर्क तुटू शकतो.