Nanded: सावित्री नगरातील एका शाळेच्या गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nanded-school-godown-massive-fire-savitri-nagar-fire-brigade-prevents-major-tragedy

नांदेड शहरातील तरोडा बु. सावित्री नगर, शिव रोड परिसरात असलेल्या एका शाळेच्या गोडाऊनला रविवारी दि. 8 जून रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील फर्निचर, शालेय साहित्य, टेंट व इतर वस्तू जळून खाक झाल्या असून सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे शेजारील निवासी इमारतींचे मोठे नुकसान टळले.

अग्निशमन विभागाला सायंकाळी 7 वाजता आगीची माहिती प्राप्त होताच प्रथम अग्निशमन पथक घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसरे अग्निशमन वाहनही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाठविण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यावर टीनशेड गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले. गोडाऊनच्या डाव्या व मागील बाजूस दुमजली निवासी इमारती असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी म्हणून 14 हजार लिटर क्षमतेचे वॉटर ब्राउझर घटनास्थळी पाचारण करण्यात आले. गोडाऊनमध्ये लोखंडी बेंच, लाकडी फर्निचर, शाळेचे टेंट, कागदपत्रे व इतर शैक्षणिक साहित्य असल्याने आग पूर्णपणे विझत नव्हती. त्यामुळे महापालिकेचा जेसीबी मागवून जळालेल्या साहित्याचा ढिगारा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझविण्यात आली व अग्निशमन दलाला ही आग नियंत्रण मिळवण्यात यश आले.

ही जागा डी. बी. हिंगोले यांच्या मालकीची असून गोडाऊनमध्ये लिटल स्कॉलर पब्लिक स्कूलचे साहित्य ठेवण्यात आले होते. शाळा व्यवस्थापनाच्या माहितीनुसार आगीत फर्निचर, टेबल, बेंच, प्लास्टिक खुर्च्या, कागदपत्रे व इतर साहित्य जळून 15 ते 20 लाखाचे नुकसान झाल्याचे तेथे उपस्थित शिक्षिका कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, गोडाऊनलगत असलेल्या मदन भगवान गायकवाड यांच्या राहत्या घरालाही आगीची झळ बसली. घरातील एक दरवाजा, खिडकी व पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जळून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र अग्निशमन दलाने वेळेवर कारवाई केल्याने घरातील अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे साहित्य सुरक्षित राहिल्याचे घरमालकांनी सांगितले.

या बचाव व अग्निशमन मोहिमेत अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांच्यासह सावळे, लांडगे, पंडित, शिंदे, गीते, खंदारे, सोडणर तसेच वाहनचालक नरवाडे, टारपे व ताटे यांनी विशेष परिश्रम घेतले. अग्निशमन दलाच्या वेगवान व धाडसी कारवाईमुळे परिसरातील निवासी इमारती आणि लाखो रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आल्याने नागरिकांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.