महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

26

विजय जोशी । नांदेड

नांदेडच्या वळण रस्त्यावर३१ वर्षाच्या महिलेवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना दोषी ठरवून जिल्हा न्यायाधीश ए.जी.मोहाबे यांनी जन्मठेप आणि दोघांना प्रत्येकी ५२ हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या दंडातील रक्कमेपैकी ५० हजार रुपये रक्कम या अत्याचार प्रकरणातील पिडीत महिलेला देण्याचे आदेश दिले आहेत.

२५ जानेवारी २०१३ रोजी एक महिला आपल्या घरात पत्र्याच्या खोलीत दहा वर्षाची मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलासोबत झोपली असताना महिलेच्या ओळखीचा पंकज नावाचा तरुण घराबाहेर आला. महिलेने दार उघडण्यास नकार दिल्यावर त्याने दार तोडून मारहाण करण्याची धमकी दिली. महिलेने तार उघडताच आरोपीने तिला ओढून रस्त्याच्या बाजूला नेते आणि तेथे मित्रांसह सामूहिक अत्याचार केला. महिला गयावया करीत राहिली, पण कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि तिघांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी महिलेने दुसऱ्या दिवशी पोलीस तक्रार दिली. जानेवारी २०१३ चा पहिला गुन्हा अत्याचाराचा विमानतळ पोलिसांनी दाखल केला.

या प्रकरणी सुरुवातीला काही दिवस सहायक पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यांनी पंकज सुरेश दाभाडे (२४), संजय मारोती घोरपडे (२०) दोघे रा. शिवनगर, शेख रसूल शेख अमीर (२५) रा.महेबूबनगर आणि नितीन संग्राम पाईकराव (२०) रा.चंद्रनगर नांदेड या चौघांना अटक केली. पुढे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी केला आणि या चार जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयात या प्रकरणी दहा साक्षीदारांनी आपले जबाब नोंदविले. या प्रकरणाचा युक्तीवाद झाला तेंव्हा सहायक सरकारी वकील अ‍ॅड.संजय लाठकर यांनी या तक्रारदार महिलेच्या साक्ष देण्यातील गुणवत्ता लक्षात घेतली तर त्यासाठी इतर जोड पुराव्याची गरज नाही, असा मुद्दा मांडला. पहिले जिल्हा न्यायाधीश ए.जी.मोहाबे यांनी आज दि.५ जुलै रोजी या खटल्याचा निकाल देताना पंकज सुरेश दाभाडे (२४) आणि शेख रसूल शेख अमीर (२५) या दोघांना सामुहिक बलात्कार प्रकरणी जन्मठेप आणि ५० हजार रुपये रोख दंड तसेच इतर कलमांसाठी वेगळी शिक्षा आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या एक लाख चार हजार रक्कमेपैकी ५० हजार रुपये या बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलेला देण्याचे आदेश न्यायाधीश मोहाबे यांनी दिल्याची माहिती अ‍ॅड.संजय लाठकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या