Nanded News – महापालिका निवडणुकीत शिंदे गटात उभी फूट, राज्यात पहिली घटना; दोन गट एकमेकांना भिडले

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये शिंदे गटात उभी फूट पडली आहे. आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्षांचा प्रचार सुरू केला आहे. यामुळे आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्यातील मतभेद संपर्क नेते सिद्धराम मेहत्रे यांच्यासमोर आले आणि त्यांच्यात आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. अगदी धमक्यापर्यंत हे प्रकरण गेले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी वेगाने सुरू झाली आहे. सर्वच पक्षाचे नेते प्रचारासाठी नांदेड शहरात दाखल होत आहेत. दुसरीकडे शिंदे गटात उभी फूट पडली असून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दहा प्रभागात शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. दुसरीकडे आमदार बालाजी कल्याणकर यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेड उत्तरमध्ये स्वतंत्रपणे कल्याणकरांनी ४० उमेदवार उभे केले आहेत. पण उत्तरमध्ये आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि शिंदे गटाने नेमलेले संपर्क नेते सिध्दराम मेहत्रे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जावून प्रचाराला प्रारंभ केला आहे.

दोन दिवसापूर्वी सिद्धराम मेहत्रे यांनी कल्याणकरांनी तिकीट नाकारलेल्या मिनल पाटील यांच्या सांगवी प्रभागात जावून प्रचार सभा घेण्याचा प्रयत्न केला. पण ही बातमी कळताच आमदार कल्याणकर समर्थक त्याठिकाणी येवून पोहोचले आणि त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार करणार्‍यांविरोधात घोषणाबाजी केली. एबी फार्म दिलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरुद्ध पक्षातील नेत्यांनीच बंडखोरांचा प्रचार नांदेड उत्तरमध्ये सुरू केल्याने कल्याणकर समर्थक आक्रमक झाले. मेहत्रे यांच्या समोरच ही घोषणाबाजी झाली. त्यावेळी आमदार कल्याणकर यांनी त्याठिकाणी येवून हस्तक्षेप केला आणि गोंधळ करू नका, असा कार्यकर्त्यांना दम दिला. त्याचवेळी त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात तुम्ही प्रचार कसा करता? ही बाब मी माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकली आहे. यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्या, असा दम दिला. त्यावेळी त्यांनी गोंधळ घालणर्‍या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. आमदार हेमंत पाटील, सिद्धराम मेहत्रे, आमदार बाबुराव कदम यांना कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून त्यांना सज्जड दम दिला. आणि कल्याणकरांचा नावाचा जयघोष केला.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारानंतर शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. यानंतर आज पत्रकारांशी बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी पक्षाच्या जीवावर जे मोठे झाले, ज्यांच्या आमदारकीसाठी आम्ही अहोरात्र झटलो त्याच बालाजी कल्याणकरांनी पक्षासाठी झगडलेल्या मंडळींची तिकीटे कापली. जी मंडळी अपक्ष म्हणून याठिकाणी निवडणूक लढवित आहेत, त्यांना बळ देण्याचे व शिवसैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आम्ही प्रचार करत आहोत, त्यांची पक्षनिष्ठ लक्षात घेवून आम्ही त्यांचा प्रचार करणारच, असे त्यांनी सांगितले. आमच्या समोर गोंधळ घालून वातावरण बिघडविण्याची सुपारी शिवाजीनगरातून देण्यात आली. मात्र, आम्ही संयमी आहोत, असा अर्थ काढू नका. मी आदेश दिला तर, माझे कार्यकर्ते संबंधित आमदाराच्या घरात घुसून गोंधळ घालतील, असा सज्जड दम त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार कल्याणकर यांना दिला आहे. यामुळे शिंदे गटातील हा वाद विकोपाला जाणार हे स्पष्ट झाले आहे. दोन गट आपसात भिडल्याने निवडणुकीत शिंदे गटातील ही फूट कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालावरून स्पष्ट होईलच.