वकिलाकडून महिलेची फसवणूक

41

सामना प्रतिनिधी। नांदेड

महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी सिंदखेड पोलीसांनी वकीलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वकीलाने महिला निरक्षर असल्याचा गैरफायदा घेत महिलेच्या पतीच्या अपघाती विम्याची रक्कम हडप केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने विम्याची चार लाख तीस हजार रुपये हडप केले. दरम्यान, याप्रकरणी महिलेने न्यायालयात धाव घेतली आहे.

महिला माहुर येथील मौजे असोली येथे राहते. सुषमा सुरेश राठोड असे तिचे नाव आहे. तिच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. तिच्या पतीने विमा काढला होता. त्याच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम पत्नीला मिळणार होती. पण त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे होते. पण महिला निरक्षर असल्याने तिला याबद्दल काही माहित नव्हते. यामुळे तिने संजय वसंतराव वानखेडे या वकिलाची मदत घेतली. वानखेडे याने बनावट कागदपत्रे तयार केली व त्यावर महिलेची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर विम्याच्या रक्कमेचा धनादेश महिलेच्या नाही तर वानखेडेच्या नावावर जमा झाला. विम्याची चार लाख तीस हजार एवढी रक्कम वानखेडेच्या नावावर जमा झाली.

दरम्यान, माहूर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता 156 (3) प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार सिंदखेड पोलिसांनी ऍड. संजय वानखेडेविरुध्द भादंडवि कलमे 417, 319, 465, 120 आणि 406 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.डी. शिवरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अप्पाराव राठोड हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या