महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना (एमबीए) आणि मुंबई उपनगर बॅडमिंटन संघटना (बीएएमयू) आयोजित नंदू नाटेकर स्मृती राज्य सीनियर आंतरजिल्हा सांघिक आणि राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष गटात ठाणे जिह्याने तर महिला गटात पुणे जिह्याने बाजी मारली. गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत सांघिक पुरुष गटाच्या अंतिम फेरीत पुणे संघाविरुद्ध 2-2 अशा बरोबरीनंतर पाचव्या आणि निर्णायक लढतीत यश सूर्यवंशीने सुवीर प्रधानचा 21-19, 21-17 असा पराभव करताना ठाणे संघाला 3-2 असा विजय मिळवून दिला. महिलांची अंतिम लढत एकतर्फी झाली. त्यात पुण्याने ठाण्याचा 2-0 असा पराभव केला. साद धर्माधिकारीने पहिल्या एकेरीत सिया सिंगचा 21-23, 21-18, 21-16 असा पराभव केला. श्रुती मुंदडा आणि तनिष्का देशपांडे या पुण्याच्या जोडीने ठाण्याच्या अक्षया वारंग आणि अनघा करंदीकर जोडीवर 21-8, 13-21, 21-18 अशी मात करताना संघाला विजयी आघाडीवर नेले.