
जपानच्या नाओमी ओसाकाने यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत तृतीय मानांकित अमेरिकन कोको गॉफवर 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आर्थर ऍश स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ओसाकाने पहिल्याच गेममध्ये ब्रेक घेत आघाडी घेतली आणि संपूर्ण सामन्यात सर्विसवर वर्चस्व राखले.
गॉफच्या तब्बल 33 अनफोर्स्ड एरर्सनेही निकालावर मोठा प्रभाव टाकला. 2021च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर ओसाकाचाने प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. विजय मिळाल्यानंतर भावनिक झालेल्या ओसाकाने कोर्टवर परत येण्याचा अनुभव ‘स्पेशल’ असल्याचे म्हटले. आता आगामपी लढतीत ओसाकाचा सामना झेक प्रजासत्ताकच्या 11व्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हा हिच्याशी होणार आहे. तिने युक्रेनच्या मार्टा कोस्त्यूकला 6-3, 6-7 (0-7), 6-3 ने हरवले. मुचोव्हा सलग तिसऱया वर्षी फ्लशिंग मेडोजच्या उपांत्य फेरीची दावेदार आहे.
व्हिनस-फर्नांडीज जोडीची चमक
महिला दुहेरीत 45 वर्षीय व्हिनस विलियम्सने कॅनडाच्या लेलाह फर्नांडीजसोबत जोडी जमवत तब्बल दहा वर्षांनंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी रशियाच्या अलेक्सांद्रोव्हा आणि चीनच्या झांग शुआई या जोडीचा 6-3, 6-4 ने पराभव केला. व्हिनसने 2016 नंतर प्रथमच महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.