सत्ताधारी आमदारांचेच मिंधे सरकारविरुद्ध आक्रमक आंदोलन

पोलिसांनी जाळीवरून बाहेर काढल्यानंतरही झिरवळ व अन्य आदिवासी आमदार व पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत किरण लहामटे, काशीराम कोतकर, खासदार हेमंत सावरा यांचाही समावेश होता.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. मिंधे सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ तसेच आदिवासींची ‘पेसा’ कायद्यांतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाचे आमदार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह राजेश पाटील, खासदार हेमंत सावरा आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम या चौघांनी आज मंत्रालयाच्या जाळीवर उडय़ा घेतल्या. संरक्षक जाळीवर पडल्याने ते बचावले. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने त्यांनी मंत्रालयातच ठिय्या आंदोलन केले.

अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मिंधे सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील आमदार नरहरी झिरवळ, राजेश पाटील, हिरामण खोसकर, किरण लहामटे, काशीराम कोतकर आणि खासदार हेमंत सावरा नाराज आहेत. याप्रकरणी झिरवळ व अन्य आमदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, पण ती भेट निष्फळ ठरली. मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असा इशारा झिरवळ यांनी दिला होता. त्यानंतर तासाभरातच त्यांनी टोकाचा निर्णय घेत थेट मंत्रालयाच्या तिसऱया मजल्यावरून उडी घेतली.

झिरवळांच्या मानेला दुखापत, बीपी वाढला

आमदार नरहरी झिरवळ आणि राजेश पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी संरक्षक जाळीवर उडय़ा घेतल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीसही जाळीवर उतरले. झिरवळ आणि इतरांनी यावेळी आदिवासी समाजाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या

मी आधी आदिवासी, नंतर आमदार

‘पेसा’ कायद्यांतर्गत भरतीसाठी आदिवासी समाजाची शंभरहून अधिक मुले गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करत आहेत, परंतु सरकारमधील एकाही नेत्याने किंवा मंत्र्याने त्यांच्याकडे ढुंपूनही पाहिलेले नाही, असा आरोप यावेळी आमदार झिरवळ यांनी केला. शासनाने तत्काळ तिथे जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मी आधी आदिवासी आहे आणि नंतर विधानसभा अध्यक्ष आहे, आदिवासी समाजानेच आम्हाला निवडून दिले आहे, त्यांचे सण-उत्सव आंदोलनातच होत असतील तर आमचा काय उपयोग, असे ते म्हणाले.