एकापेक्षा एक सुरेल पारंपारीक कोळी गीतांच्या ठेक्याच्या तालावर थिरकत पाज पंढरीतील मच्छिमारांनी सजविलेल्या सोन्याच्या नारळाची होडीतून वाजत गाजत मिरवणुकीने शोभायात्रा काढत श्रीराम मंदिर येथून मिरवणुकीने सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला शांत होण्यासाठी दर्या राजाला नारळ अर्पण केला. रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यात असलेले पाजपंढरी हे गाव संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले मच्छिमार कोळी समाज लोकवस्तीचे गाव आहे. या पाजपंढरी गावात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
रुमाल कमरेला बांधून हाती वल्हे घेतलेली पुरुष मंडळी तर नऊवारी साड्याा परिधान केलेल्या महिला वर्गाने आपल्या डोक्यावर मंगल कलश घेत समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आपल्या पारंपारिक कोळी वेशभुषेत आणि कोळी गीतांच्या ठेक्यावर ताल धरला. दर्या राजाला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला. दरवर्षी मासेमारीला समुद्रात जाण्याआधी खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी मच्छिमार कोळी समाज बंधु भगीनींकडून सागराची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. ही अनेक वर्षांपासूनची पाजपंढरी गावाची परंपरा आहे. काळ बदलला तरी कोळी बांधवांच्या या परंपरेत बदल झालेला नाही. संपूर्ण पाजपंढरी गावातून कोळी मच्छिमार बंधु भगिनी समाज बांधव हे आपला पारंपारीक कोळयांचा वेश परिधान करून मिरवणुक काढतात. त्यामध्ये लहान थोर महिला पुरूष सहभागी होत पारंपारीक कोळीगीते आणि वाद्याच्या तालाच्या ठेक्यावर या मिरवणुका निघतात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्राला विधिवत अर्पण केला जातो.
पाजपंढरी या गावात एकुण दहा मंडळे आहेत दरवर्षी यजमान पार्टीला गावात वर्षभर होणारे सण उत्सव साजरे करण्याचा गावाकडूनच मान दिला जातो. तसा येथील गावाचा प्रघात आहे त्यानुसार यावर्षी यजमान तुरेवाले मंडळ यजमान पार्टी आहे. त्यामुळे यावर्षीचा मान तुरेवाले मंडळाला मिळाला आहे. कोळी समाज अध्यक्ष अंकुश दोरकुळकर यांच्या नेर्तृत्व आणि मार्गदर्शनाखाली पाजपंढरी या गावातर्फे यजमान तुरेवाले मंडळाने समुद्राला नारळ अर्पण केला. तर अन्य असलेल्या रस्ताळे मंडळ, जूनी कुलाबकर, नवीन कुलाबकर, होमावाले, मधळी आळी, शेतवाडी, गोरेवाले, विठाबाई, वाडीवाले या अशा पाजपंढरी गावातील मंडळांनी आप आपल्या मंडळाचे नारळ समुद्राला अर्पण केले. कोळी संस्कृतीचे दर्शन काय असते ते पाजपंढरीत आज पाहायला मिळाले. त्यात मराठी शाळा आणि श्रीराम हायस्कुलच्या विदयाथ्र्याच्या सहभागाने आणखीनच रंगत आली.
पावसाळयात दोन महिने बंद असलेला मासेमारी व्यवसाय नारळी पौर्णिमेनंतर जोमाने पुन्हा सुरू होतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करत खवळलेला समुद्र शांत होवू दे अस गा-हाणे या दिवशी दर्या राजाला घातल जातं. निसर्गाबद्दल कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव हा सण साजरा करतात. भर समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धन्याच्या सुरक्षिततेसाठी कोळी महिला समुद्र देवाची पूजा करतात. उधानलेल्या समुद्रातील नौका सुरक्षित राहाव्यात अशी मनोभावे पूजा त्या करतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या धन्याला सुरक्षित ठेवून कुंकवाचे रक्षण कर आमच्या बोटीला मुबलक मासोळी मिळू दे असे यावेळी गाबांध-हाने घालतात.
दर्या राजाला आज उधान आयलय…
धनी गेलय दर्यावर …, चांद राजा तु रं.. माझ्या भावा तू रं…
ध्यान ठेव धन्यावर, ध्यान ठेव धन्यावर…,
आभाळं फाटलयं…, तुफान उठलयं…,
सुटलाय वादळी वारा…, काळीज फाटलय लहू ही दाटलय…,
जीव झालाय वेडा…, शपथ हाय तुला राखी पुनवेची, रक्षण त्याच कर…,
चांद राजा तु रं माझ्या भावा तु रं… ध्यान ठेव तू धन्यावर…
अशाप्रकारची दर्या राजाला विनंती करणारी पारंपारिक गीते या सोहळ्याचे आकर्षण असतात.