मुलाच्या शिक्षणासाठी ‘लाडकी बहीण’ टॉवरवर, प्रशासनाला फोडला घाम; तब्बल 14 तासांनंतर महिला टॉवरवरून उतरली खाली

पहाटे तीन वाजता टॉवरवर चढून ‘शोले’ स्टाइल आंदोलन करणाऱया ‘लाडक्या बहिणी’ने सरकारच्या आणि प्रशासनाच्या नाकीनऊ आणले. मुलाच्या शिक्षणातील आर्थिक अडचणीचा अडसर दूर व्हावा यासाठी ‘बीएसएनएल’च्या टॉवरवर चढलेली महिला तब्बल 14 तासांनंतर खाली उतरली त्यावेळी प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. जुन्नर तालुक्यातील आर्वी येथे हा प्रकार घडला.

‘मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे ना, मग जोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इथे येत नाहीत, तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नाही,’ असा पवित्रा या महिलेने घेतला होता. त्यामुळे महिलेला टॉवरवरून उतरविण्यासाठी प्रशासनाला अनेक तास मनधरणी करावी लागली. ‘मुख्यमंत्री कार्यालयाला तुमचं म्हणणं कळवलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या, तुमचा प्रश्न सोडवला जाईल,’ असे सांगून तिला खाली उतरण्याची विनंती टॉवरखाली थांबलेल्या पोलिसांनी केली. त्यावर ‘माझी लेकरं उघडय़ावर पडतील, असं काही करायला मला भाग पाडू नका,’ असे ती सांगत असल्याने या ‘लाडक्या बहिणी’ने प्रशासनाला घाम पह्डला होता.