
पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि काँग्रेसची 70 वर्षांची जहागिरी हे शिळे मुद्दे पुन्हा उकरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पह्डणीचे भाषण केले. ‘‘काँगेसने देशाचे कसे वाटोळे केले, गांधी परिवाराला पंतप्रधान पद म्हणजे आपली जहागिरी वाटते,’’ हे नेहमीचेच पालुपद त्यांनी लावले. दहा वर्षांत आम्ही कसे सगळे बदलून टाकले, असे दावेही त्यांनी केले. मात्र तब्बल दीड तासाच्या भाषणात मोदींनी चीनची घुसखोरी व अमेरिकेशी व्यापार करारासारख्या ज्वलंत मुद्दय़ांवर अवाक्षरही काढले नाही.
माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या आधारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांना बोलण्यापासून रोखले गेले. ही रणनीती सत्ताधाऱयांच्या अंगलट आली. या मुद्दय़ावरून विरोधकांनी सलग तीन दिवस आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी महिला खासदारांनी संसदेत जोरदार निदर्शने केली. त्यांचा हा रुद्रावतार पाहून मोदी बुधवारी लोकसभेत आलेच नाहीत. आज ते येतील असे वाटत होते. मात्र सुरक्षेच्या भीतीने त्यांनी राज्यसभेत बोलणे पसंत केले. तिथे त्यांनी देशासमोरच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी नेहरू, काँग्रेस व गांधी कुटुंबाला लक्ष्य केले.
आम्ही विकास प्रत्यक्षात उतरवला!
‘‘नेहरू हे देशातील तेव्हाच्या 35 कोटी लोकसंख्येला मोठी समस्या मानायचे. इंदिरा गांधी 57 कोटी जनतेला समस्या मानत. मात्र आम्ही लोकसंख्येला देशाची ताकद समजतो. हा आमच्या आणि त्यांच्या विचारातील फरक आहे,’’ असे ते म्हणाले. ‘‘काँगेसच्या काळात विकास केवळ काल्पनिक स्वरूपात होता, आम्ही तो प्रत्यक्षात उतरवला,’’ असा दावा त्यांनी केला. मोदी तेरी कब्र खुदेगी, या घोषणेचा सातत्याने उल्लेख करत मोदींनी सहानुभूती मिळविण्याचाही प्रयत्न केला.
मोदींनी या वेळी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी संसदेत चर्चा न करणे हा आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान आहे. तर राहुल गांधी यांनी रवनीतसिंग बिट्टू यांना गद्दार म्हणणे हा शीख समाजाचा अपमान आहे, असा दावाही मोदींनी केला.
मोदी लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपताहेत – प्रियंका
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी खोडून काढला. ‘‘मोदींनी सभागृहात यायची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे आता ते अध्यक्षांच्या मागे लपत आहेत. अध्यक्षांच्या तोंडून निरर्थक गोष्टी वदवून घेत आहेत,’’ असे प्रियंका म्हणाल्या. ‘‘कालच्या घटनेबद्दल जे काही सांगितले जात आहे, ते साफ खोटे आहे. पंतप्रधानांना इजा पोहोचवण्याचा किंवा धक्काबुक्की करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. सत्ताधारी सदस्यांना कोणत्याही पुस्तकाचा आधार घेऊन मूर्खासारखी बडबड करण्याची मुभा दिली जाते आणि विरोधी पक्षनेत्यांना रोखले जाते. त्यावर आमचा आक्षेप आहे. तीन महिला खासदार त्यासाठी निदर्शने करत होत्या. मोदी त्यांना घाबरले, असा सणसणीत टोला प्रियंकांनी हाणला.
लोकसभेत चौथा दिवसही वाया
चौथ्या दिवशी कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा समोरासमोर आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही वेळातच सभागृह तहकूब केले. ‘‘सभागृहात फलक आणि पत्रके आणली तर कामकाज होणार नाही. आज होणार नाही, उद्याही होणार नाही,’’ असे त्यांनी सांगितले.
सभापतींना भीती, मोदींसोबत अघटित घडणार होते
पंतप्रधान मोदी अभिभाषणा- वरील चर्चेला उत्तर देणार होते. मात्र काँग्रेसच्या काही सदस्यांनी पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाण्याची तयारी केली. त्यामुळे काहीतरी अघटित घडू शकते अशी कुणकुण मला लागली होती. त्या काळजीपोटी मीच पंतप्रधानांना सभागृहात येऊ नका असा सल्ला दिला, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेत सांगितले.































































