मोदींच्या सभेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय, 60 बसेस सभेसाठी आरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । येवला

शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येवला आगारातून 60 बसेस आरक्षित केल्या गेल्याने दैनंदिन प्रवास करणारे शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर गैरसोय झाली.

साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी इथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, येवला यांच्या नावे 60 बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यात 30 बसेस या धुळे आगाराच्या, 4 बसेस पेठ आगाराच्या व येवला आगाराच्या 26 अशा एकूण 60 बसेस आरक्षित केल्या गेल्या. सकाळी पाचपासून या आरक्षित बसेस तालुक्यात ग्रामीण भागात लाभार्थी गोळा करण्यासाठी रवाना करण्यात आल्या. त्यामुळे दररोज तालुकाभरातून शालेय शिक्षणासाठी येवल्यात येणाऱया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बसेस रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत होता. येवला आगारातील एकूण 40 बसेसपैकी 26 आरक्षित झाल्याने उर्वरित 14 बसेसद्वारे रोजच्या 358 फेऱयांपैकी केवळ 118 फेऱया दिवसभरात झाल्याने प्रवाशांचीदेखील मोठी गैरसोय झाली.

येवला आगाराचे 26 बसेसचे रोजचे उत्पन्न हे अंदाजे अडीच लाख इतके असून या 26 बसेसच्या आरक्षणामधून अंदाजे दोन लाख पंच्याहत्तर हजार मिळू शकतील अशी माहिती येवला आगारातील के.ए. मुंढे यांनी दिली. जिल्हाभरातून मोदींच्या सभेला 400 बसेस आरक्षित करण्यात आल्याची माहिती आहे. एसटी महामंडळाचा यातून थोडय़ा प्रमाणात नफा होणार असला तरी विद्यार्थी व प्रवाशांचे झालेले नुकसान यातून भरून येणारे नाही.