चंद्रावर वाजणार आयफोनची रिंगटोन! फोन घेऊन जाण्यास ‘नासा’कडून परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील कोणत्याही व्यक्तीने कधी विचारही केला नसेल की, चंद्रावर गेलेला अंतराळवीर आपल्या कुटुंबातील व्यक्तीला थेट व्हाट्सअॅप मेसेज करेल किंवा इन्स्टाग्राम रील शेअर करेल, परंतु आता हे चित्र लवकरच खरोखर दिसणार आहे. अमेरिकी अंतराळ एजन्सी ‘नासा’ने आपला दशकभरापूर्वीचा जुना नियम बदलला आहे. अंतराळात जाणाऱया अंतराळवीरांना सोबत आयफोन घेऊन जाण्यास नासाने अखेर परवानगी दिली आहे. नासाच्या अॅडमिनिस्ट्रेटर जेर इसाकमॅन यांनी नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे की, आगामी क्रू-12 आणि आर्टिमिस-2 मिशनवर जाणाऱया अंतराळ प्रवाशांना स्मार्टफोन घेऊन जाता येणार आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात गेलेले प्रवासी हे आपल्या स्मार्टफोनद्वारे आपले अनुभव पर्सनल टचसोबत रेकॉर्ड करू शकतील. याद्वारे ते अंतराळातून आपल्या कुटुंबासोबत जोडले जाऊ शकतील. जगासोबत अंतराळातील हाय क्वॉलिटीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकतील. आतापर्यंत अंतराळात फोन घेऊन जाण्यास मनाई होती. यामागे तीन प्रमुख कारणे होती. सर्वात पहिले कारण म्हणजे सुरक्षा होय. फोनचे सिग्नल स्पेसक्राफ्टच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये अडचण निर्माण करू नये, दुसरे कारण म्हणजे डय़ुरेबिलिटी होय. स्मार्टफोन स्पेसचे रेडिएशन आणि दबाव झेलू शकतील का? आणि तिसरे कारण म्हणजे सिस्टम इंटरफेरेन्स होय. स्पेस स्टेशनच्या उपकरणासोबत फोनची व्हेवलेन्थची टक्कर झाली तर काय करावे, ही तीन प्रमुख कारणे होती. त्यामुळे आतापर्यंत अंतराळवीर ई-मेल किंवा व्हिडीओ कॉलसाठी नासाने दिलेल्या खास लॅपटॉपचा वापर करू शकत होते.

  • मोठी चाचणी घेतल्यानंतर अंतराळवीरांना अंतराळात स्मार्टफोन घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चाचणीतून स्पष्ट दिसले आहे की, आधुनिक स्मार्टफोन आता इतके अडव्हान्स्ड झाले आहेत की, ते स्पेसफ्लाइटचे सर्व सुरक्षा नियम पूर्ण करतात. नासाच्या या निर्णयामुळे सायन्सप्रति लोकांची आवड आणखी वाढेल. अंतराळात गेलेले अंतराळवीर थेट चंद्रावरून पृथ्वीचे दृश्य लाइव्ह दाखवतील. प्रोफेशनल कॅमेऱ्याच्या तुलनेत स्मार्टफोनचा कॅमेरा जास्त खराखुरा आणि कनेक्टेड वाटेल, असेही नासाने म्हटले आहे.